फॉर्म भरताना चूक, वृद्ध निराधार महिला योजनेसाठी अपात्र

Update: 2020-07-25 01:27 GMT

अनुसया अवघडे बीडच्या माजलवाग तालूक्यातील 77 वर्षांची एक विधवा महिला. मुलबाळ नसल्याने मजुरी करुन एकट्याच राहतात. संजय गांधी निराधार योजनेचं मानधन रेशनचे गहू, तांदुळ आणि मजुरीतून मिळणारे थोडे पैसे हेच त्यांच्या जगण्याचे मुख्य आधारस्तंभ. पण यातील संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे मानधन बंद झाल्याने अनुसया यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अनुसया अवघडे यांना संजय गांधी निराधान योजनेतील मानधन बंद झाल्याचं समजलं, त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी त्या टाकरवणच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गेल्या तिथं त्यांना ‘मुलगा असल्याने मानधन बंद झालं’ असल्याचं सांगण्यात आलं.

पण याला जबाबदार होतो तो म्हणजे त्यांच्या नावाने भरला गेलेला चुकीचा अर्ज. झालं असं की, अनुसया यांना रमाई घरकुल योजने अंतर्गत घर मंजूर झाले. घर मंजूर झाल्यानंतर काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी त्या ग्रामसेवकांकडे गेल्या. ग्रामसेवकांनी त्यांना एक फॉर्म दिला व भरुन देण्यास सांगितला. फॉर्म भरता येत नसल्याने अनुसया यांनी तो दुसऱ्याकडून भरुन घेतला. पण त्या फॉर्म भरुन देणाऱ्या व्यक्तीने त्या अर्जात वारस म्हणून मुलगा म्हणून भावकीतल्या पुतण्याचे नाव टाकल्याने तलाठी मंडळ अधिकारी यांच्या पंचनाम्यात वारस म्हणून मुलाची नोंद झाली आणि आजी अपात्र ठरल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

संबंधित महिलेच्या मदतीकरता सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता अधिकाऱ्यांनी नवीन अर्ज दाखल करायला सांगितला.

या बाबत बोलताना सत्यभामा म्हणाल्या की, ‘असे अनेक लोक आहेत जे सध्या कोरोनाच्या परिस्थितीत नवीन अर्ज भरण्यासाठी असमर्थ आहेत. आँनलाईन फाईल दाखल करण्याचा खर्च 280 रुपये आहे. एक दोन चकरा मारून हे काम करण्यासाठी प्रवासात खुप पैसे जातात. एखाद्या कार्यकर्त्यांकडून या फाईलीचे काम करून घ्यायला हे लोक गेले तर ते 3000हजार रुपये सहज घेतात. त्यामुळं लोकांच्या अडचणीत मदत न करणाऱ्या नातेवाईकांना विनंती आहे चुकीच्या गोष्टी फार्म मध्ये भरू नका असं आवाहन सत्यभामा यांनी केले आहे.

Similar News