दोन दिवस पाणी येणार नाही, असं पाणीवाला कालच सांगून गेलाय. म्हणून काल घरातली छोट्यात छोटी भांडी सुद्धा भरून ठेवली आहेत. न जाणो दोनाचे चार दिवस पाण्याची वाट पहावी लागली तर? पण मैत्रिणींनो, आपण किती भाग्यवान आहोत ना? निदान आज ना उद्या, आपल्या घरातल्या नळाला धारदार पाणी येणार, याची आपल्याला खात्री आहे. नाहीच आलं, तर बाजारातून पाण्याचे कॅन विकत आणण्याइतकी पाण्याची आणि पैशांची आपल्याकडे उपलब्धता आहे. पण, बीड जिल्ह्यात पाण्याचा थेंबसुद्धा नाहीये, अशी सकाळीच बातमी वाचली. काय करत असतील तिथले लोक? कसं जगत असतील, कसा जुगाड करत असतील? तेही ह्या भर उन्हाळ्यात? नुसत्या विचारानेही तोंडचं पाणी पळालं!
ऑफिसच्या एसी केबिनमध्ये किंवा घरात कुलरसमोर बसून ही बातमी वाचत असताना त्या परिस्थितीची धग आपल्याला कदाचित जाणवणार नाही, पण दोन दिवस पाणी येणार नाही कळलं, की त्यांच्या दुःखाची थोडीफार जाणीव होऊ लागते. मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. पाण्यासाठी मैलोन्मैल त्यांनी डोईवर घागर ठेवून केलेला अनवाणी प्रवास आठवतो. आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, ह्या विचाराने मन अस्वस्थ होतं. मग वाटतं, जे पिंडी, ते ब्रह्मांडी!
अर्थात, आपण आपल्या परीने केलेली पाण्याची बचत हा त्यांच्यासाठी पाणी पुरवण्यात खारीचा वाटा ठरू शकतो. ह्या विचाराने लगेचच कामाला लागले. माझ्या डायरीत नोंद केली आणि दिवसभरात आपल्याला पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याची आखणी केली. पिण्यासाठी आवश्यक तेवढंच पेल्यात पाणी घ्यायचं, उष्ट-खरकटं पाणी फुलझाडांना, पक्ष्यांना घालायचं, वॉशिंग मशीनचं कपडे धुतलेलं पाणी मोरीत वापरात आणायचं, भाज्या-फळं धुण्यासाठी दरवेळी नळ न सोडता एकाच पातेल्यात पाणी घेऊन लागेल तसं वापरायचं, आलेल्या पाहुण्याला आवश्यक तेवढंच पाणी द्यायचं, पाणी कधीही शिळं होत नाही, त्यामुळे साठवलेलं पाणी फार तर वस्त्रगाळ नाहीतर उकळून पुनर्वापरात आणायचं असं ठरवून टाकलं. हा चार्ट माझ्या मैत्रिणींना पण शेअर केला. त्यांनीही तो फॉलो करण्याचा शब्द दिला. खारीचा वाटा उचलल्याचं समाधान मिळालं.
आपण जगाला सुधारायला जाण्याचा हट्ट सोडून द्यायचा आणि आपण काय करू शकतो ह्याचा विचार करायचा. मनुष्य हा अनुकरणप्रिय असतो. आपण आपल्या वागणुकीतुन समोरच्याला अनुकरण करण्यास भाग पाडू शकतो. त्यासाठी सुरुवात आपल्यापासून करायला हवी. पाण्याची बचत करणं हा जरी खारीचा वाटा असला, तरी ह्या कृतीतून आपण लोकांवर नाही, तर स्वतःवरच उपकार करत आहोत असं समजायला हरकत नाही. अन्यथा, भविष्यात म्हणावं लागेल....'एक होतं पाणी!'
(आगामी काळात त्यावर केलेलं भाष्य ह्याच शीर्षकाअंतर्गत चित्रपटातून पाहायला मिळेलच...! )