"डॉक्टर तिचंच करा ऑपरेशन..!

Update: 2019-07-18 07:01 GMT

"मिस्टर ×××× अहो काय हे? सहा महिन्यात दुसऱ्यांदा गर्भपात करण्याची वेळ आलीय. आधीच हिच्या अंगात रक्त कमी, दोन सिझेरियन झालीयेत.. कसं झेपणार तिला? तुम्ही म्हंटला होतात मागच्या वेळी की तुम्ही ऑपरेशन करून घ्याल म्हणून!!"

मी खरंच थोडी चिडले होते..

"मॅडम,राहून गेलं ऑपरेशन करायचं....आता त्यापेक्षा हिचंच करून टाका ना ऑपरेशन..."

आता मात्र मी पूर्ण खचले..अहो पण हे नेहेमीचंच आहे. आजपर्यंत खूप पेशंटच्या नवऱ्यांनी मला अगदी तोंड भरून आश्वासनं दिली की नक्की कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करून घेतो पण आजवर एकही जण घेतलं करून म्हणून सांगायला आलेला नाही.

सरकार तर्फे सुद्धा पुरुषांसाठी खूप वेळा मोफत शिबिरे असतात. ऑपरेशन केल्याबद्दल पैसे सुद्धा मिळतात पण पुरुष जराही तिकडे फिरकत नाहीत. पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेविषयी उगाचच खूप गैरसमज आहेत. खरंतर ही शस्त्रक्रिया अतिशय सोपी असते. पुरुषांना जेमतेम अर्धा दिवस हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. फार विश्रांतीची गरज नसते. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा

पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.

या एका गैरसमजापायी खूप पुरुष ही शस्त्रक्रिया करून घ्यायला घाबरतात. या शस्त्रक्रियेनंतर त्याचा पूर्ण परिणाम होण्यासाठी 3 महिने लागतात. म्हणजे आधीच तयार झालेले शुक्राणू निघून जाण्यासाठी 3 महिने लागतात. त्यानंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. हे माहीत नसल्याने सुद्धा अनेक गैरसमज होतात आणि ही शस्त्रक्रिया फेल होते असे प्रवाद पसरवले जातात.

स्त्री ही पाळी सुरू झाल्यापासूनच पोटात दुखणे, रक्तस्राव या गोष्टींना सामोरी जाते. मग गरोदरपणात वेगवेगळ्या प्रकारे तिला दुखण्याचा सामना करावाच लागतो आणि प्रसूती हा तर दुसरा जन्मच. अश्या इतक्या स्थित्यंतरातून, कधीतरी दिव्यांतून पार पडलेल्या आपल्या बायकोला आता काहीही त्रास नको ,कुटुंबनियोजनाची जबाबदारी माझी आहे. असं वाटणारे किती पुरुष आहेत?? अगदी नाहीयेत असंही म्हणणं अन्यायचं ठरेल याची मला कल्पना आहे पण असं नुसतं वाटून उपयोग नाही ना.. पुढे होऊन ऑपरेशन करून घेणारे खरंच अगदी थोडे आहेत.

यात "त्यांचं काही नको,माझंच करा अजून एक ऑपरेशन " असं म्हणणाऱ्या बायकाही कमी नाहीत बरं का... विशेष करून सासू मुलाच्या ऑपरेशनचा विषयही काढू देत नाही. यामागे अर्थात मनात घट्ट रुजलेली पुरुषप्रधान विचारसरणी आहे.

लहानपणापासून स्त्री पेक्षा स्वतःला शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यवान समजणाऱ्या पुरुषांचं धैर्य या एवढ्या छोट्याशा ऑपरेशन साठी का टिकू नये हा प्रश्नच आहे.कदाचित असंही असेल की पुरुषांना एरवी विशेष शारीरिक त्रास सहन करावा लागत नाही कधीच ,त्यामुळे सवय नसते. पण तरीही त्यांनी आपल्या बायकोचा नक्की विचार करावा असं मला वाटतं. पुरुषांना दूषणे देण्याचा माझा अजिबात उद्देश नाही पण ४-४ वेगवेगळी ऑपरेशन्स झालेली पेशंट परत जेव्हा गर्भपातासाठी येते तेव्हा मन तुटतं तिच्यासाठी..

पूर्वी स्त्रिया घरीच असायच्या त्यामुळे घरचा कमावता पुरुषच एकमेव होता. मग त्याची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा स्त्रीचीच करा अशी मानसिकता होती .पण आता बायका पुरुषांच्या जोडीने बाहेर पडून कमवत आहेत. तरीही कुटुंबनियोजन ही जबाबदारी आपलीच असं बायकांनी का मानावं??

एकविसाव्या शतकात अनेक नव्या संकल्पना स्वीकारलेला आपला समाज ह्या काही जुन्या बुरसटलेल्या कल्पना आणि गैरसमज नक्कीच झुगारून देऊ शकतो. नाही का?

डॉ शिल्पा चिटणीस जोशी

वंध्यत्व व स्त्रीरोगतज्ज्ञ

Similar News