दिव्या स्पंदना यांचं ट्विटर बंद होण्यामागे काय कारण आहे?

Update: 2019-06-03 10:31 GMT

सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टीका करणाऱ्या कांग्रेसच्या प्रवक्त्या आणि सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांचं ट्विटर आकाऊंट डिलीट झालंय. दिव्या यांनी स्वतः हे अकाऊंट बंद केल्याचं बोललं जातंय. यासोबत त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद आहे. नव्या सरकारमधल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुभेच्छा देणारं त्यांचं शेवटचं ट्विट होतं.

दिव्या यांनी काँग्रेसला रामराम दिल्याच्या अफवा उडत असताना त्यांनी या अफावांना पूर्णविराम दिलाय. आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसनं मात्र, या प्रकरणावर कोणतंच अधिकृत भाष्य केलंल नाही. ही काँग्रेसची रणनीती असू शकते असंही बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी काँग्रेस प्रवक्ते वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी जाणार नाहीत असं स्पष्ट केलं होतं.

काँग्रेससाठी बजावली महत्वाची भूमिका

दिव्या स्पंदना या काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख होत्या. त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक प्रचार केला. शिवाय काँग्रेस पक्षाच्या बदललेल्या शैलीमागे आणि राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनमागे त्यांचाच हात आहे असं सांगितलं जातं. याशिवाय निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

पंतप्रधान मोदींशी तुलना हिटलरशी करतांना दिव्या यांनी फोटोशॉप केलेली पोस्ट वापरली होती. त्यावरुनही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. तेव्हा त्या बॅकफूटवर गेल्या होत्या.

निकालाचा परिणाम?

दिव्या स्पंदना यांच्या ट्विटरवरुन गायब होण्याला लोकसभा निवडणुकांचे निकाल कारणीभूत आहेत अशी चर्चा आहे. राफेलसहित इतर मुद्द्यांवर काँग्रेसनं निवडणुकीत जोरदार प्रचार केला पण त्याला यश येऊ शकलं नाही. दिव्या स्पंदना यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनं चांगली कामगिरी केली पण त्याचं रुपांतर निवडणुकीच्या यशात होऊ शकलं नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. त्याच पद्धतीनं दिव्या यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अपयशाची जबाबदारी घेत आपलं ट्विटर अकाऊंट बंद केल्याचं बोललं जातंय.

Similar News