जय भिममध्ये दाखवल्याप्रमाणे संघिनीला घर मिळालंच नाही, जाणून घ्या खऱ्या संघिनीची बिकट परीस्थिती...
आपण सगळ्यांनी जय भीम चित्रपट पाहिला असेलच. सिनेमा पाहिल्यानंतर किमान दोन मिनिटं जय भीमच्या आठवणींमध्ये शांतच बसला असाल. दोन भुमिका आपल्या मेंदूतून निघतच नसतील. पहिली सुर्या ने साकारलेली ऍड. चंद्रू आणि संघिनी ची भुमिका कायमची मनात कोरली गेली असेल. यातील न्यायमुर्ती चंद्रू यांच्यावर आधारीत हा सिनेमा आहे असाच सगळीकडे गवगवा झाला. परंतू संघिनी ची भुमिका ज्या स्त्रीवर आधारलेली आहे त्या बद्दल फारसं काही बोललं गेलं नाही. त्याच संघिनी बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आपण म्हणाल सिनेमात पाहिलं तसंच असेल तर तसं नाहीये. मुळात सिनेमात राजकन्नूचं नाव हे जसंच्या तसं वापरण्यात आलं आहे. परंतू त्याच्या पत्नीचं नाव मात्र बदलून संघिनी करण्यात आलं आहे. या संघिनीचं खरं नाव हे पार्वती अम्मा आहे. पार्वती अम्माची खरी कथा नेमकी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
राजकन्नूची पत्नी पार्वती अम्मा सध्या चेन्नईच्या एका दुर्गम भागात भाड्याच्या झोपडीत राहतात. पावसापासून वाचण्यासाठी झोपडीच्या छतावर प्लास्टिक पसरलेले पाहायला मिळते. झोपडीत स्वयंपाकघरच नाही. त्यांना झोपडीबाहेर अन्न शिजवावे लागते. पावसात त्या चुलीवर जेवण कशा बनवत असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी.
चेन्नईमध्ये पार्वती अम्मा ज्या भागात राहतात तो भाग वर्षाचे बारा महिने बहुतांश पाण्यात बुडालेला असतो. पार्वती अम्मा अनेक गोष्टी आजही अनभिज्ञ आहेत. या भागात सहसा उपेक्षित समाजातील लोक राहतात. स्वच्छता अभियानाच्या घोषणांना इथे काहीच अर्थ नाही. पार्वती अम्मा यांच्या झोपडीच्या आसपास साधं शौचालय देखील नाही. त्यांच्या घरापासून सरकारी स्वच्छतागृहही तब्बल एक किलोमीटर अंतरावर आहे.
राहण्याच्या दृष्टीने जागा जितकी वाईट असू शकते, त्याच ठिकाणी पार्वती अम्मा आपल्या कुटुंबासह आज राहतात. त्यांच्या झोपडीकडे जाणार्या् गल्ल्या इतक्या अरुंद आणि पाण्याने आणि कचऱ्याने झाकलेल्या आहेत की दोन माणसांना एकत्र चालणं कठीण आहे. पार्वती अम्मा आणि त्यांचं कुटुंब, त्यांच्यासारख्या शेजारी राहणाऱ्यांची कुटुंबेही वर्षानुवर्षे रोज याच वाटेवरून जात आहेत. त्यांच्या झोपडीभोवती शेण टाकलं जातं. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत या कुजलेल्या शेणाच्या दुर्गंधीची कल्पना आपण करू शकता.
पार्वती अम्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून दुसरं काहीही नको आहे. राहण्यासाठी सरकारनं एक घर द्यावं, अशी त्यांची इच्छा आहे. पार्वती अम्माची अवस्था पाहून राघवा लॉरेंस या अभिनेत्याने त्यांना स्वखर्चातून घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय अभिनेता सुर्याने पार्वती अम्माला १० लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. चित्रपट येताच सुर्याने इरुलर समाजातील शिक्षणावर खर्च करण्यासाठी १० लाखाचा धनादेश मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केला.