कोरोनाचा व्हायरसमुळे लॉकडाऊन चा फटका सर्वांनाच बसला आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात बऱ्याच जोडप्यांची लग्न लांबली त्यांच दुख तर आपण सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून पाहतच आहोत. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही एक जोडप्याने शासनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ न देता अनोख्या पद्धतीने लग्न केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
"ना वऱ्हाड, ना वरात, दुचाकीवरून थेट घरात' अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात हा विवाह सोहळा पार पाडला. इन्सुली गावातील स्वप्नील दीपक नाईक आणि सातार्डा येथील रसिका मनोहर पेडणेकर यांचं लग्न फक्त दोन माणसांच्य़ा उपस्थितीत पार पडलं. लग्नानंतर नवदाम्पत्याची वरातही दुचाकीवरून दारात पोहोचली.
विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला वधू-वरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते. नवरदेवाचा मित्र आणि भटजी मिळून अवघ्या चार जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. नवदाम्पत्याची वरात चक्क दुचाकीवरून दारात आली. लग्न सोहळ्यापूर्वी वधू-वरांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रीतसर परवानगी घेतली.