CoronaVirus: 'या'आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ११ महत्त्वपुर्ण सूचना
राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपण अगदी निर्णायक ट्प्प्यावर पोहोचलो आहोत. आपण करोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल असं मत मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांना व्यक्त केलं आहे.
कोरोना विषाणू संबंधीत धोक्याला नागरिक पाहीजे तितक्या गांभीर्याने घेत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपुर्ण निर्णय घेताना नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचं पालन होण कोरोनाशी लढण्यासाठी अत्यावश्यक आहे.
– काल राज्यात १४४ जमावबंदी कलम लावले होते. पण आता मला राज्यात संचारबंदी लावावी लागते आहे. आज सकाळी काही ठिकाणी काही लोक फिरायला बाहेर पडत असल्याची माहिती मिळाली. नाइलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत.
– चार किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नये.
– आपण राज्याच्या सीमा सील केल्या होत्या. पण आज आपण आंतरजिल्हा सीमादेखील सील करत आहोत. काही जिल्हे, ठिकाणे येथे हा विषाणू पोहोचलेला नाही. त्या जागा सुरक्षित ठेवायच्या आहे. आणि जिथे पोहोचला आहे तिथेच त्याला संपवायचं आहे.
– देशांतर्गत विमानतळ तात्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे.
– जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्मिती करणार कारखाने, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. बेकरी सुरु असतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. घाबरण्याचं काही कारण नाही.
– सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील. प्रार्थनास्थळांमधील धर्मगुरुंना फक्त आत जाऊन प्रार्थना, पूजा करण्याची परवानगी असेल.
– गर्दी नाही म्हणजे नाही. शहरातही बस अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जात आहे. लोकल बंद केल्या आहेत.
– खासगी वाहनं अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडतील. अन्यथा बाहेर पडणार नाही.
– टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन आणि रिक्षामध्ये चालक अधिक एक अशी मर्यादित संख्या असेल. तीदेखील अत्यंत महत्त्वाची असेल तरच परवानगी दिली जाणार आहे.
– प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.
– घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.