CoronaVirus: 5 कोरोना बाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा; आज मिळणार डिस्चार्ज

Update: 2020-03-20 07:03 GMT

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमधील पाच रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार असून त्यांच्या प्रकृतीत पुर्ण सुधारणा झाली असल्याची आनंददायी वार्ता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे. सोबतच राज्यातील एकूण रुग्णांमध्ये 3 रुग्णांची वाढ होताना कोरोनाबाधितांची संख्या 52 झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या (Corona Virus) चाचणीसाठी सध्या टेस्टींग लॅबची कमतरता भासत आहे. मात्र येत्या काही दिवसात 8 टेस्टींग लॅबची वाढ लवकरच करणार आहे. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा बोजा रुग्णांवर न पडता सरकार सर्व खर्चाचा भार उचलणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी 22 मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा करत सर्व देशवासीयांना हा दिवस पाळण्याचं आवाहन केलं आहे. याविषयी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही जनता कर्फ्यूचं समर्थन करताना महाराष्ट्राच्या जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेस 100% टक्के प्रतिसाद दिला पाहिजे असं म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, मुंबई, ठाण्यासह अन्य काही जिल्ह्यांमंध्ये जमावबंदी लागू केली असून नागरिकांनी अतिआवश्यक परिस्थितीतच घरातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीतही नागरिक घरातून बाहेर पडत असून ही चिंतेची बाब असल्याचं टोेपे यांनी म्हटलंय.

Similar News