कोरोनाचे गारुड!

Update: 2020-03-16 05:06 GMT

'कोरोना' या केवळ एकाच शब्दाने आख्या जगाला खिळवून ठेवलं आहे. जात,धर्म, प्रांत श्रीमंत-गरीब देश यातून कोणही सुटलेलं नाही. काही ठिकाणी तर मंदिराचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे साक्षात भगवानसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत, असे दिसते. ज्या देवाचा धावा केला जातो तिथेच प्रवेशबंदी आली आहे. देशातील कित्येक रुग्णालयातील राखीव ठेवण्यात आलेल्या मर्यादित खाटांची संख्या पाहिले की, लक्षात येतं, भारतासारख्या देशामध्ये सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती काय आहे. शासनाने धार्मिक संस्थ, देवस्थांनाना निधी देण्याऐवजी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट आणि सक्षम करण्यासाठी दिला पाहिजे.

चीनच्या वूहान प्रांतातून चालू झालेली विषाणूं संसर्गाची मालिका अर्ध्याहून अधिक जगात जाऊन पोहचली आहे. या संसर्गाच्या निमित्ताने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत,त्याची चर्चा होणं गरजेचं आहे.

१. या आजाराची उत्पत्ती कशी झाली यावरच मूलतः प्रवाद आहेत. हा रोग जनावरांकडून माणसाकडे आणि आता माणसांकडून-माणसाकडे संक्रमित झाल्यासंबंधी माहिती प्रसारित होत आहे. त्याचबरोबर,काही जैविक किंवा रासायनिक अस्त्राच्या गळतीमुळे याची उत्पत्ती झाली का? असासुद्धा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे. चीनसारख्या हुकूमशाही देशातून हा हाहा:कार माजलाय त्यामुळे त्यातील सत्य बाहेर येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याचबरोबर, अमेरिकेसारख्या सत्तापिपासू आणि धूर्त राष्ट्राचा यात हात असण्याचीही एक शक्यता आहे. आर्थिक महायुद्धामुळे हे असले डावपेच अनितीमान मानले जात नाहीत. त्यामुळे शक्यतेला वाव उरतोच.

2. भारतासारख्या देशामध्ये अशा संसर्गजन्य रोगाची ज्यावेळी साथ येते, त्यावेळी आपण एक देश किंवा यंत्रणा म्हणून कसे तोंड देते याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. शासकीय पातळीवर चालू असलेले प्रयत्न सध्यातरी योग्य दिशेने चाललेले असल्याचे चित्र समोर येत आहे. तथापि, एक नागरिक म्हणून आपले वर्तन काय? रोगराई पसरल्यानंतर त्याचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून योग्य ती खबरदारी घेणे हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. तथापि कोणताही शास्त्रीय गृहीतक आणि आधार नसणारे गाय, गोबर यांचे निरर्थक संदेश व्हाट्सएपच्या विद्यापीठातुन प्रसारित करणारे महाभाग काय कमी नाहीत.सार्वजनिक स्वच्छतेचे अनुपालन आपण केवळ साथीचे रोग आल्यानंतरच करणार का?

3. तिसरा मुद्दा आहे दृकश्राव्य माध्यमांचा. टीव्ही चॅनेल्सचा सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे 'चोवीस तासांचे दळण'. हे दळण चालविण्यासाठी कोणत्यातरी विषयाची फोडणी टाकून तो विषय कंटाळा येईपर्यंत चघळत ठेवला जातो. वास्तविक, कोरोना हाच केवळ जीवघेणा आजार नाही तर, इतरही असंख्य जीवघेणे आजार आहेत, ज्यामुळे वर्षाला हजारो-लाखो लोक मरत असतात.तरीही, साथीच्या रोगाची दहशत बसण्याइतकी माहिती प्रसारित केली जात आहे. आयुष्यात पहिल्यांदाच हात धुवायला शिकल्यासारखे कार्यक्रम अखंड सुरू आहेत! गम्मत आहे ह्या सगळ्याची.

4. चौथा मुद्दा आहे 'इन्फोडेमिकचा'.

चुकीच्या आणि भयस्पद पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे उदयोगधंदे ठप्प झाले आहेत. जागतिक बाजारात अगोदरच असलेली मंदी, देशांतर्गत अर्थकारणाला आलेली मरगळ, नोटांबंदी, जीएसटी, बुडणाऱ्या बँका, फरार कर्जबुडवे, धार्मिक दंगली यावर उपाय पुढे येण्यापेक्षा ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे.

त्यामुळे,एक जबाबदार नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहे.ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपणही स्वयंशिस्तीने हातभार लावण्याची गरज आहे. अन्यथा सर्व देशाची अवस्था झपाटल्यासारखीच आहे.

 

- उमेशचंद्र यादव-पाटील

वकील,उच्च न्यायालय

Similar News