करोना विरुद्ध भारत... जनता कर्फ्यू ला भारतीयांची साथ अपेक्षीत

Update: 2020-03-22 01:50 GMT

संपूर्ण जगावर ओढवलेल्या करोना विषाणू (Corona Virus) संकटाविरुद्ध लढण्याच्या दृष्टीनं आज भारताची कसोटी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केले आहे. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ही साखळी तुटावी यादृष्टीनं आज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कर्फ्यू पाळावा असं आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाचं देशातील सर्वच स्तरातून स्वागत केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर आज जनता या आवाहनाला कसा प्रतिसाद देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या संकट काळात वैद्यकीय क्षेत्रासह अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांचे धन्यवाद देण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातूनच टाळ्या वाजवण्याचंही आवाहन मोदींनी केले आहे.

करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी साखळी तोडण्याच्या दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याआधीच देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये खबरदारी घेतली जातेय. महाराष्ट्रातही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बद करण्यात आली आहेत.

आता तर लोकल प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे किंवा तातडीच्या वैद्यकीय गरजेसाठीच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तर जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी रेल्वेनं आज तब्बल ३७०० गाड्या रद्द केल्या आहेत.

Similar News