आज मंत्रालयात येणाऱ्या महिलांना जेव्हा अगत्यपूर्वक फुले आणि एक पत्र देऊन त्यांचे स्वागत केलं जात होतं तेव्हा त्यांना एक सुखद धक्का बसत होता. हे स्वागत मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी हसतमुखाने शुभेच्छा देऊन करीत होते आणि पत्र होते खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे..
या अनोख्या स्वागताने भारावून गेलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन भेटेल त्याला दाखवीत होत्या तर अनेक जणींनी स्मार्ट फोनमधून या पत्राचा फोटो आपल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना पाठवून आपला आनंद द्विगुणित केला.
या पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचे आभार मानताना म्हटलंय की,
“आपल्या महाराष्ट्राला राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदी गोपाळ अशा अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा सुवर्णमय इतिहास आहे आणि नाविण्यपुर्ण काम करण्यासाठी हा इतिहास सदैव आपल्याला प्रेरित करीत असतो.आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलगी, पत्नी, आई अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच, मंत्रालयाच्या माध्यामातून महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देत असता. तुमच्या सहकार्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करु शकतो.
या योगदानासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तुमचे आभार व्यक्त करतो.