नाशिक शहरातील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांनी आत्महत्या केली नसून तेलंगणा पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. याची सखोल चौकशी करून तेलंगणा पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
सराफ व्यावसायिक विजय बिरारी (Vijay Birari) हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे नसून व्यापारी होते. त्यांची आत्महत्या नसून सायराबाद पोलिसांनी हत्या केली आहे. त्यामुळे सायराबाद पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन जाब विचारणार असल्याची माहिती चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सराफ असोसिएशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
बिरारींचा मृत्यू झाल्याचे समजताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आधीच दोन पोलीस अधिकारी व कॅन्टीनमधील कर्मचारी उपस्थित होते. कायद्यानुसार त्यांच्यामार्फत फिर्याद दाखल करणे गरजेचे असताना नाशिक पोलिसांनी सायबराबाद पोलिसांमार्फत फिर्याद दाखल केली आहे.
बिरारी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंत्यविधीवेळी बिरारी यांना कुटुंबियांनी पाहिले असता त्यांचा कान तुटलेला दिसला, अंगावर मारहाण केल्याची चिन्हे होती. तसेच, त्यांच्या हातात सळई घुसवल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बिरारी यांची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे पुरावे समोर आले आहेत. बिरारींना न्याय मिळेपर्यंत पर्यायाने सराफ समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू असा विश्वास चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.