घरात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, त्यात दिव्यांग त्यामुळं केवळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर नांदेडच्या भाग्यश्री माधवराव जाधव हिनं भारताची मान जागतिक स्तरावर उंचावलीय. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराअॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन कांस्य पदकांची कमाई केलीय.
प्रतिकूल परिस्थितीत भाग्यश्रीनं यश मिळवलं
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील होनवडच इथं सामान्य शेतकरी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला. कुटुंबातील परिस्थिती प्रतिकूल असूनही भाग्यश्रीनं क्रीडा क्षेत्रात नाव कमावयाची जिद्द सोडली नाही. अवघ्या दीड वर्षात तिनं क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॅराअॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धांमध्ये क्रीडा कौशल्य दाखवत घवघवीत यश संपादन केलं.
भाग्यश्रीनं संधीचं सोनं केलं
राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केल्यानंतर पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियानं भाग्यश्रीची निवड जागतिक पॅराअॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी केली. चीन इथंल्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली भाग्यश्री ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. निवड समितीचा निर्णय सार्थ ठरवत भाग्यश्रीनं या स्पर्धेत भारतासाठी दोन कांस्यपदकं पटकावलीत. चीनमध्ये बिजिंग शहरात 7 मे पासून सुरु असलेल्या जागतिक पॅराअॅरथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भालाफेक व गोळाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात भाग्यश्रीने भारतासाठी दोन कांस्य पदकांची कमाई केलीय. होनवडज ते चीन या दीड वर्षांच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्रीला प्रशिक्षक प्रलोभ कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजू मुजावर, आंतरराष्टरीय क्रीडा प्रशिक्षक सरदार लक्कीसिंह यांनी मार्गदर्शन केलं.