बाओबाब आणि साळिंदर

Update: 2019-12-15 06:59 GMT

आफ्रिकेच्या जंगलात फार वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट आहे ,साळींदर आणि एका बाओबाब नावाच्या विलक्षण दिसणाऱ्या वृक्षाची.

आफ्रिकेच्या जंगलात अनेक पशु पक्षी असतात. सिंह, बिबळे, हत्ती, चित्ते, जिराफ, गरुड, घुबड ,ससे आणि माकडं तर चिक्कार. इतरही अनेक असतात साळींदर असतं त्याच्या अंगावर काटे असतात.

छान सगळे मजेत जगतात, शिकारी करतात, तुडुंब गवत खाऊन आळसावलेली हरणं गवतात लोळतात,

पाणघोडे चिखलात थंडावा घेत बसतात.

एके वर्षी तिथे भीषण दुष्काळ पडतो, हिरवं गवत सुकू लागतं, झाडं कोमेजून जातात, प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, जंगलातले सगळे पाणी साठे सुकून जातात,त्यात मासे ,खेकडे , पाणसाप सुदधा होरपळून मरतात, सगळीकडे रोगराई पसरते,

तरी या विभिन्न प्राण्यांच्या मधले स्वभाव काही बदलत नाहीत. कोण कुणाला मारतो ,तर कोण कुणाला घाबरवतो,आता अशाही परिस्थितीत एकमेकांना मदत करायची सोडून हे प्राणी एकमेकांची टिंगल टवाळी करतात.

यात माकडं तर अगदी पुढे असतात,सगळ्या झाडांची नासधूस करा, फांद्या तोडा असे उद्योग करतात, मग काय त्यांना जंगलातल्या माळावर एक मधोमध सुकलेल्या तळ्या काठी झाड दिसतं,त्याचं नाव असतं बाओबाब, हे झाड असतं गलेलठ्ठ आणि ओबडधोबड, जुनाट आणि म्हातारं हे झाड अगदी पार वाळून गेलेलं आणि बोडकं झालेलं, ही माकडं नेहेमी या झाडाची आणि त्या झाडाखाली राहणाऱ्या साळीदराची चेष्टा करतात.

साळींदर म्हणजे कुरूप दिसणारा मोठा उंदीर आणि बाओबाब चं हे झाड म्हणजे निरुपयोगी असं म्हणून ही माकडं त्याला चिडवत बसतात.

साळींदर बिचारं हिरमुसतं , त्याला वाईट वाटतं, आणि बाओबाब ला सुद्धा दुःख होतं, त्या दोघांकडे कुणी लक्षच देत नाहीत..सगळे त्या दुष्काळात सुद्धा स्वार्थी वागत असतात. पण बाओबाब आणि साळींदर एकेमकांचे बेष्ट फ्रेंड होतात , कधी कधी साळींदर साठी बाओबाब आपल्या आंबट तुरट शेंगा खायला द्यायचा,आणि साळींदर बाओबाब चं गलेलठ्ठ मोठ्ठं खोड आपल्या खरखरीत काट्यांनी खाजवून द्यायचा.

अखेर एक दिवस येतो, जंगलातील पाणी संपून जातं,

सगळ्यांना खूप तहान लागते, सगळे सैरभैर होतात, थकून जातात, हताश होतात, आता कोण वाचवणार यांना?? सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो,

पाणी मिळणार कधी, पावसाळ्याला तर अजून बराच वेळ आहे, दुष्काळात पाऊस तर कधी कधी पडतच नाही.

सगळे पुरते घाबरून जातात , आता मात्र सगळे एकत्र येतात, हत्ती सगळ्यांना बोलावून घेतात, एक सभा भरते, सभेत एकमेकांना उगीच त्रास नं देण्याचा सगळे मिळून निर्णय घेतात,आणि मग जंगलात पाणी कुठून मिळेल असा प्रश्न विचारतात, कुणालाच पाणी कुठे सापडेल याचा थांगपत्ता नसतो.

अचानक एक म्हातारी अजगर सगळ्यांना सांगते मला माहितेय जंगलात पाणी कुठे आहे ते, आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं.

म्हातारी अजगरीण म्हणते, त्या साळींदर ला बोलावून घ्या, त्याच्याकडे पाणी कुठे आहे याची एक क्लुप्ती आहे, पण तो आपल्या सगळ्यांवर नाराज आहे.

माकडांनी त्याला खूप त्रास दिलाय, आधी माकडांनी त्याची माफी मागा, आणि माकडांनी जाऊन त्याला विनंती करा. मगच तो आपल्या सगळ्यांना पाणी देऊ शकतो.

सगळ्यांना वाटलं अरेच्चा , हे कसं काय बुवा शक्य आहे, आपल्या सगळ्यांना पाणी देणं आणि तेही त्या साळींदर ला.

पण अखेरी हत्ती माकडांना समज देतो आणि सगळे निघतात साळींदर कडे.

हे दृश्य मोठं मजेशीर असतं, इतके सगळे प्राणी एकत्र, मोर्चा काढल्या सारखे निघतात, पाणी नाही तर काय करणार ?

अखेर म्हातारी अजगरीण त्या सगळ्याना हळू हळू सुकलेल्या तलावाच्या काठी घेऊन येते,

तिथे बाओबाब शी गप्पा मारत बसलेला एकटाच साळींदर त्यांना दिसतो, मग माकडं त्याच्या कडे जातात आणि त्याला सॉरी म्हणतात.

सगळे प्राणी सुदधा त्याची माफी मागतात, पण साळू काही खुश होत नाही, तो म्हणतो तुम्हाला पाणी हवंय ना? मग असं करा सगळ्या प्राण्यांनी सुद्धा या माझ्या बाओबाब मित्राची माफी मागा, याला सुद्धा तुम्ही खुप त्रास दिलाय ना.

सगळे प्राणी काकुळतीला आलेले असतात, पाणी पाणी करून थकलेले असतात, सगळे बाओबाब ची सुदधा माफी मागतात .

आणि मग साळींदर ला आनंद होतो. सगळ्या जंगलातल्या प्राण्यांसमोर तो आपलं अंग फुलवतो, खुसफूस असा आवाज करतो, आणि त्याचा काटेरी पिसारा फुलवतो. त्यातल्या अनेक काट्यांतून एक काटा तो ओढून काढतो , त्याच्या अंगातून रक्ताचा एक थेंब दिसू लागतो, हळू हळू त्यातून रक्त यायला लागतं, सगळे साळींदर कडे थक्क हुन पाहत असतात, आणि मग, साळींदर तो काटा तोंडात घेऊन , बाओबाब झाडाच्या खोडा त घुसवतो, सगळे प्राणी हे पहात बसतात, कुणाला काही कळतंच नाही, नेमकं पुढे काय होणार?

थोडा वेळ जातो, आणि काय आश्चर्य ,त्या बाओबाब च्या मोठ्या ढोल खोडातून पाणी पाझरू लागतं, हळूहळू तिथून पाण्याची एक धार येऊ लागते, आणि ते सुकलेलं तळं भरून जाऊ लागतं, सगळे प्राणी ते मधुर स्वच्छ पाणी पिऊन तृप्त होतात..

बाओबाब चं झाड तेव्हापासून जंगलात सगळ्यांचं लाडकं होऊन जातं..बाओबाब पण आता हिरवागार टवटवीत दिसुलागतो ,त्याला आलेल्या मोठ्या शेंगा टणक असतात ,त्या शेंगा घेऊन माकडांची पिल्लं खेळतात आणि बागडतात.

मेघा फणसे

Similar News