माझ्या बापानं रक्त गाळून हा पक्ष उभा केला- सुप्रिया सुळे

Update: 2020-02-22 11:49 GMT

पैठणमधील राष्ट्रवादीच्या सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) संताप सगळ्यांना पाहायला मिळाला. या सभेमध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भडकलेल्या सुप्रिया सुळेंनी थेट कार्यकर्त्यांवरच निशाणा साधला. ‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून हा पक्ष उभा केलाय. त्याला गालबोट लावाल तर याद राखा’ असा सज्जड दम यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना भरला आहे.

सभेमध्ये सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादचे संजय वाकचौरे (Sanjay Vakchoure) आणि दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येत घोषणाबाजी करुन कार्यक्रमात गोंधळ घातला. विधानसभा निवडणुकीदरम्यानही या दोधांमधील वाद शिगेला पोहोचला होता. दोनही नेत्यांमधील वैमनस्य अशा पद्धतीने सुप्रिया सुळेंसमोर आलं. कार्यकर्त्यांना शांत करुन मग त्यांनी शब्दांचा मारा सुरु केला.

“तुम्हाला तुमच्या पक्षाचा अभिमान नसेल. पण माझ्या बापानं रक्त गाळून हा पक्ष उभा केला आहे. हे तुम्ही छापलं तरी चालेल. आदरणीय पवार साहेब ८० वर्षांचे आहेत. रक्त गाळून, घाम गाळून पवार साहेबांसोबत असंख्य कार्यकर्त्यांनी हा पक्ष बांधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्त्याने त्याला गालबोट लावायचा प्रयत्न केला, तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे.” असा दम त्यांनी दिला.

“अशा प्रकारची हुल्लडबाजी मी पहिल्यांदाच पाहिली. असे प्रकार मी खपवून घेणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे हे समजून घ्या. ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील” असंही त्या म्हणाल्या.

Similar News