अनेक सुशिक्षित पुरुष व महिला असा विचार करतात की, मद्यपानामुळं सेक्समध्ये अधिक मजा येते किंवा त्यात रंग भरले जातात. हा अतिशय मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात लैंगिक क्रिया आणि मद्यपान यांच्यात दुरान्वयेही सख्य, संबंध नाही. मद्यपानामुळं लैंगिक ताकद वाढते, हिच मुळात भ्रामक समजूत आहे.
एका प्रख्यात व्यसनमुक्ती केंद्रात स्त्रियांसाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला. त्यावेळी तिथे येणाऱ्या अनेक स्त्रिया या निराशेने ग्रस्त म्हणून व्यसनाधीन झालेल्या आहेत, असे दिसले. धक्कादायक बाब म्हणजे सेक्सच्या आनंदासाठी अनेक पती स्वतः आपल्या पत्नीला व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलत होते. अशाच व्यसनाधीनतेच्या समुद्रात बुडालेल्या नीरजाची ओळख झाली. नीरजा लहानपणापासून आर्थिक संपन्नता नांदत असलेल्या घरात वाढलेली. आई वडिलांची एकुलती एक. अत्यंत लाडात लहानाची मोठी झालेली. घरात आर्थिक संपन्नता असली तरी, नीरजा अतिशय शिस्तीत वाढली होती. अती लाड ना आईला चालत, ना वडिलांना. अशा वातावरणात मोठी होत असताना तिने शिक्षणातही उत्तम प्रगती केली. एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत असतानाच तिचे आदेशशी रितसर ठरवून लग्न झालं.
आदेशही वरिष्ठ हुद्द्यावर काम करत होता. पुण्यात दोघांनी मिळून स्वतःचे घर घेतले. तसं सगळं सुरळीत चाललेलं होतं. काही वर्षांतच त्यांच्या संसाराला मुलाची चाहूल लागली, तेव्हा दोघे अतिशय खूष होते. मुलीच्या जन्मानंतर नीरजाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, मुलीच्या पालनपोषणात काही कमी राहू नये, असं तिला वाटत होतं. तेव्हापासून तिचं आयुष्यच बदलून गेलं. तिनं केवळ मुलीवर लक्ष केंद्रित केलं. तिचा दिनक्रम मुलीच्याच अवतीभवती आखला गेला. आदेशही आता चांगला कमावत होता. त्यामुळं नीरजानं नोकरी सोडून मुलीकडं लक्ष द्यायला सुरवात केली, याचं त्याला कौतुकच होतं. हळूहळू मुलगी मोठी होत गेली, तसतशी तिला आईची गरज भासेनाशी झाली. तसं नीरजा आणि तिच्या मुलीची अगदी गट्टी होती; मात्र तरीही मुलगी आता आपल्या वयाच्या मैत्रिणींमध्ये रमू लागलेली. आदेश त्याच्या कामात सतत व्यग्र असत. त्यामुळं नीरजाला एकटेपणा जाणवू लागला. ऐन भरात असताना नोकरी सोडलेली. इतकी वर्षे मुलगी सोडून अन्य कोणत्याही गोष्टीचा तिनं विचार केलेला नव्हता. आता १४ वर्षांनी परत नोकरी कशी करायची, हे तिला समजत नव्हतं. या वाढत्या एकाकीपणामुळे तिच्यात आणि आदेशमध्ये खटके उडायला लागले. नाही म्हटलं तरी आदेशकडं नीरजाचं दुर्लक्ष झालेलं होतंच. याबाबत आदेशनं कधी काही बोलून दाखवलं नव्हतं. तोही त्याच्या कामात व्यग्रच असायचा. ऑफिस संपल्यानंतर पार्टी, मिटींग हे रोजचंच झालेलं. यावरुनच एकदा दोघांचं भांडण चालू असताना आदेश नीरजाला म्हणाला, “इतके दिवस तुझं सेक्सकडे दुर्लक्ष झालं, तेव्हा मी काही म्हणालो नाही. जरा स्वत:कडे बघ, किती मागासलेली वाटतेस. माझ्यासोबत पार्टीला, मिटींग्जना तुला कसं नेऊ? साधी बिअरही तू घेत नाहीस.” त्याचं हे वाक्य नीरजाच्या कानात घुमत राहीलं. आपण खरंच सेक्स लाईफकडे खूपच दुर्लक्ष केलं, हे तिला जाणवलं. मग आता काय करावं?, तिनं ही गोष्ट आदेशलाही बोलून दाखविली. या सर्वांवर उपाय म्हणून नीरजानं हळूहळू बिअर घेण्यास सुरवात करावी, असं त्यानं सुचवलं. त्यामुळे सेक्स लाईफही एक्सायटिंग होईल आणि नीरजा ‘सोशल क्लास’मध्येही येईल, असं त्याला वाटलं.
नीरजाची ही कहाणी ऐकून अंगावर काटाच आला. आदेशसारखे अनेक सुशिक्षित पुरुष व महिला असा विचार करतात की, मद्यपानामुळं सेक्समध्ये अधिक मजा येते किंवा त्यात रंग भरले जातात. हा अतिशय मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात लैंगिकक्रिया आणि मद्यपान यांच्यात दुरान्वयेही सख्य, संबंध नाही. मद्यपानामुळं लैंगिक ताकद वाढते, हीच मुळात भ्रामक समजूत आहे. याच समजुतीतून अनेक पुरुष वेश्यागमन करताना मद्यपान करून जातात.
काही तीव्र दाहक विषद्रव्यही कामोत्तेजक म्हणून वापरली जातात. ही द्रव्ये कृत्रिमरित्या तयार केली जातात. दारूतून ती दिली जातात. या द्रव्यांमुळं मूत्राशयाचा आणि मुत्रमार्गाचा तीव्र दाह होतो. त्यामुळं तिथल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळं लिंगात रक्तपुरवठा वाढून ताठरता जाणवू लागते. अशा प्रकारची द्रव्ये वापरणं, हे कोणत्याही क्षणी जीवावर बेतू शकते. हे सर्व प्रकार मर्दानगीच्या खोट्या संकल्पनेतून जन्माला येतात.
प्रियदर्शिनी हिंगे