वाहनांच्या आणि मानवी गर्दीत गुदमरलेल्या मुंबईकरांचा गोरेगाव ईस्ट भागातील आरेच्या वनात श्वास अडकलेला आहे. काँक्रीटमय झालेल्या मुंबईत केवळ हाच एकमेव हिरवा तुकडा अजूनपर्यंत जिवंत म्हणता येईल.
आरेकॉलोनीमधील मोकळी जागा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक मोठे बिल्डर यावर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसराचे झपाट्याने काँक्रीटीकरण होत आहे.
आरेला लागूनच गोकुलधाम हा एरिया वसलेला आहे. मुंबईतील मोस्ट हंटेड प्रॉपर्टीज मध्ये गोकुलधामचे नाव टॉप वर आहे. गोरेगाव ईस्ट मधील गोकुलधाम अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात हिरव्या कच्च जंगलासहित डोंगरांची लहानशी माळ आहे. या देखण्या नैसर्गिक भागात अनेक गगनचुंबी टॉवर्स, मॉल्स, बंगले, कॉर्पोरेट ऑफिसेस, 5 स्टार हॉटेल्स आणि लहानमोठी घर वसलेली आहेत.
शेकडो TV स्टार्स आणि अनेक बडे फिल्म स्टार्स इथे राहतात. याशिवाय इथे लागूनच फिल्मसीटीचा विस्तीर्ण परिसर आहे. तर लगतच्या आरे जंगलात अजुनही जंगली श्वापद तग धरुन आहेत कारण संजय गांधी नॅशनल पार्कची हद्द देखील आरेला खेटूनच आहे.
दिवसो दिवस या जंगलात मानवी हस्तक्षेप वाढत चालल्यामुळे जंगली जनावरे बावचळून मानवी जंगलात अनपेक्षितपणे प्रवेश करण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. त्यामुळे इथे अनेक वेळा इथे वाघाचेही दर्शन होते.
आमचे घरही गोकुलधाम मध्ये आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही आरे मध्ये सकाळी जॉगिंगला जातो. अनेक रनिंग, सायकलिंग ग्रुप्स, लाफिंग ग्रुप्स, योगा ग्रुप्स इथे ऍक्टिव्ह आहेत.
मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात राहतांना गोरेंगावात अजूनही आमच्या खिडकीत चिमण्या, कावळे, कबुतर, पोपट आणि इतरही पक्षी येतात, कोकिळेची कुहू कुहू ऐकायला मिळते. ती केवळ आरेची नैसर्गिक संपदा अजून शिल्लक असल्यामुळे.
आरेशी असे भावनिक नाते असल्यामुळे आणि एकूणच हा पर्यावरण संरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे ह्या जंगलाचा ह्रास होताना बघणे फार त्रासदायक आणि चिंताजनक आहे.
शासनही आता पर्यावरण संरक्षणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बेजबाबदारपणे हा अतिमहत्वाचा जंगल परिसर नष्ट करण्याच्या तयारीत आहे. आणि सोबतच इथली समृद्ध इकोसीस्टीम (ecosystem) नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
जगभरात आम्ही पर्यावरण प्रेमी आहोत म्हणून ढोल बडवायचे आणि इथे जंगलावर कुऱ्हाडी चालवायच्या असे ढोंगी दुटप्पी धोरण राबवल्या जात आहे. शासनाचा निषेध करावा तितका कमीच आहे!