बचत गटाच्या बैठकीत दारु बंदिची मीटिंग, दारुबंदीसाठी महिलांचा संघर्ष

Update: 2020-12-25 01:30 GMT

मुरुमगावात कित्येक दिवस बैठक घेऊन पुढे न जाणारे काम शेजारच्या गावातील त्या रॅलीने सुरू झाले. त्या गावातील रॅलीत मुरुमगावच्या काही महिला आलेल्या होत्या. त्यांनी सांगितलं हमारे मुरुमगावमे दारूबंदी करत हो? मला संधी मिळाली, मी माझ्या मोडक्या तोडक्या हिंदीत बोललो, "तो बुलावो ना मीटिंग हम आयेंगे." त्यांनी बचतगटाच्या बैठकीतच ही बैठक घेण्याचे ठरले.

त्या बैठकीत संगीता पोया, एका डोळ्याने अंध असलेल्या सायरा बेगम शेख, बिंदिया मडकांब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दारूबंदीवर चांगली चर्चा घडवून आणली आणि यानंतर दोन बैठका झाल्या. सातत्याने चर्चा, बैठका आणि ॲक्टिव कार्यकर्त्यांची गृहभेट यातून दारूविक्री बंदीसाठी ग्रामसभा घेण्याचे ठरले. ग्रामसभेला पोलीस विभाग, आदिवासी पुजारी, गाव पाटील भुम्या यांच्यासह लोकांना निमंत्रण दिले गेले.

पोलिस विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात उपस्थित होते. त्यांनी दारूबंदीसाठी पोलिसांतर्फे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसभेच्या बैठकीतून ग्राऊंडवर काही काम होणार नाही हे आमच्या टीमला माहीत होते. पण हा कायदेशीर पाठिंबा असणे आवश्यक होता. या ग्रामसभेत गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेतला. अशा रीतीने कागदावर दारूविक्री बंदीची लढाई आम्ही जिंकलो होतो.

प्रत्यक्ष दारुबंदीच्या अंमलबजावणीचे आव्हान

आता कागदावर असलेला ठराव जमिनीवर आणण्याचे काम महिलाच करू शकणार होत्या. यासाठी आम्ही महिलांची दारूबंदी गाव संघटना स्थापन केली. आता दारूचे नियंत्रण करण्यासाठी आमची गावसंघटना काम करणार होती. तिला पोलीस दल तसेच गावातील काही नागरिक सक्रीय मदत करणार होते. गावसंघटनेच्या बैठकीत आम्ही काही कार्यक्रम ठरवले. खालील कार्यक्रम राबवण्याचे ठरले.

ग्रामसभेत झालेल्या दारूबंदीची माहिती सर्वांना समजावी यासाठी भव्य रॅली काढणे आणि त्याचवेळी सर्व दारुविक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना चार दिवसात तयार असलेला स्टॉक संपवण्याची सूचना देणे महिलांना सोबत घेऊन पोलीस विभागाच्या मदतीने गावातील दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांचा दारूचा सडवा, दारू नष्ट करणे. पोलिसांकडून त्यांना यापुढे केस करण्याची तंबी देणे. सातत्याने गाव संघटनेच्या बैठका घेऊन तिला प्रशिक्षित करणे, डावपेच आखणे. पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांचा सहभाग वाढवणे

गावपुजारी भुम्या पाटील तसेच इतर पाठिंबा देणारे नागरिक यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्याचा पाठिंबा टिकवणे. या कार्यक्रमाची सातत्याने अंमलबजावणी गावसंघटना करत गेल्या. पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात हे या कामात सक्रीय झाले. त्यांनी पोलीस विभागाचा सहभाग वाढवला. गावात वारंवार शांततेच्या मार्गाने कारावई होऊ लागली. महिलांनी शेकडो टन मोहसडवा अनेक अहिंसक कृतीतून नष्ट केला.

दारूबंदी करणे हेच ध्येय सातत्याने महिलांच्या डोक्यात बसले होते. महिला केव्हाही अचानक घरातून निघत. दारुविक्रेत्यांच्या घरात घुसून दारू बाहेर काढत. समजावून ऐकत नसतील त्यांच्यावर केसेस झाल्या. महिलांवर देखील जीवघेणे प्रसंग ओढवले. दारू पीत बसलेल्या लोकांना हटकले म्हणून संगीता पोया यांचा गळा एका हॉटेल मालकीणीने अवळला. यावर वातावरण तंग झालं. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. आणि त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तब्बल महिनाभर तिला जेलची हवा खावी लावली. महिला जीवावर उदार होऊन काम करत होत्या. एका महिलेचा नवरा दारू पिणारा होता. त्याला त्याच्या बायकोचे दारूबंदीचे काम पसंत नव्हते म्हणून त्याने दारू पिवून एक दिवस हातात कुऱ्हाड घेतली. तर दुसऱ्या हातात विषाची बाटली घेतली. हे पी नाहीतर तुला कुऱ्हाडीने मारतो. बराच वेळ झटापट झाली. त्या महिलेने रागाने विष प्राशन केले. ती महिनाभर आयसीयूमध्ये होती. इतक्या घटना घडूनही कार्यकर्त्या मागे हटत नव्हत्या.

या भीतीने दारू विक्रेते काहीसे मागे सरायला लागले. महिलांची इतकी दहशत झाली की गावातून त्या निघाल्या तरी दारू पिणारे विकणारे पळून जात असत. यातून गावातील मोहाची दारू बऱ्यापैकी कंट्रोल झाली होती. पण मोहाची दारू हे केवळ हिमनगाचे टोक होते. खरंतर मुरुमगाव हे विदेशी दारू तस्करीचे केंद्र होते. पण ही दारू गावात येत नव्हती. जवळच्या जंगलातून ती इतर जिल्ह्यात नेली जात होती. याची कुणकुण महिलांना लागलेली होती. बैठकीत त्यांनी "सर ये दारू मिलनेको होना फिर काम बनेगा" असे अनेकदा बोलून दाखवलेले होते. नक्षल भाग असल्याने पोलीस रात्री बाहेर फिरू शकत नव्हते. याचा फायदा दारू तस्करांनी घेतला होता.

एके दिवशी महिलांची रात्री गस्त सुरू होती. रात्री त्यांना एक गाडी जंगलाच्या दिशेने जाताना दिसली. या बहाद्दूर महिलांनी भर पावसात तिचा पाठलाग केला. पुलावर असलेल्या पाण्यातून गाडी पुढे गेली या महिला गुडघाभर पाण्यातून रात्री जंगलात गेल्या. तर दूरवर त्यांना एक ट्रॅक्टर आणि पीक अप दिसली. महिला दिसताच दारू तस्करांनी ट्रॉली तिथेच जंगलात सोडून धूम ठोकली. महिला त्या ठिकाणी गेल्या नाहीत. मात्र त्यांनी काही अंतरावर रात्रभर ठिय्या मांडला. वरून पावसाची रिपरिप जंगली प्राण्यांची भीती या परिस्थितीत त्या महिला रात्रभर तिथे बसून राहिल्या. पहाटे त्यांनी मला फोन केला. मी माझे सहकारी भास्कर कड्यामीना घेऊन तात्काळ मुरुमागवाच्या दिशेने निघालो. रात्रभर कुणी त्या ठिकाणी आले नाही हे पाहून महिलांनी पुन्हा घरी जाऊन अंघोळ करून पुन्हा यायचे ठरवले. त्या घरी आल्या पुन्हा घटनास्थळाकडे निघाल्या तर तो माल पुन्हा उचलण्याचे काम तस्करांनी सुरू केले. महिला वाढलेल्या पाण्यातून पुन्हा पलीकडे गेल्या. आम्ही नदीच्या अलीकडे पोहचलो होतो. समोरून पिक अप येत होती. त्या गाडीचा पाठलाग हातात काठ्या दगड घेऊन या महिला करत होत्या. नदीच्या अलीकडे आम्ही होतो. ड्रायव्हरने पीक अप नदीत घातली. पण पाण्याच्या प्रवाहाने गाडी पुढे जाईना, पलिकडे आम्ही उभा होतो.

त्याने गाडी रिव्हर्स घेतली महिला आडव्या झाल्या पण त्याने वेगाने गाडी पळवली. महिला बाजूला सरल्या आम्ही दुसऱ्या रस्त्याने गाडीचा माग काढत जायचा प्रयत्न केला. गाडी मिळाली नाही. आम्हाला वाटले अरेरे मिळालेली दारू गेली. आम्ही पुन्हा महिलांना शोधत दुसऱ्या बाजूने गेलो. महिला दिसल्या. आम्हाला पाहून त्या खूप आनंदी झाल्या, "सर आवो बहुत माल मिला है," आम्ही जाऊन पाहतो तर तब्बल ट्रॉलिभर विदेशी दारू आणि त्याला कडे करून या महिला बसल्या होत्या. मी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी मला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी पीएसआय थोरात यांना कॉल केला. नक्षल भाग असल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली पाठवली. ती भरून पोलीस स्टेशनला आणा असे सांगितले. आम्ही त्या ट्रॉलीमध्ये पाट्यांनी दारूच्या बाटल्या भरत होतो. गच्च भरलेली ट्रॉली घेऊन आम्ही मुरूमगावात पोहचलो.

त्या दारूची अख्ख्या गावातून मिरवणूक काढली.

" मुरुमगावमे दारुबिक्री नही चलेगी, मुरुमगावमे रहवा होगा तो दारूबंदी करना होगा" अशा घोषणांच्या निनादात आम्ही दारूने भरलेल्या ट्रॉली तून निघालो होतो. पोलिस स्टेशनला गेलो. बाटल्या मोजायला पोलीस कमी पडत होते, असा पराक्रम या महिलांनी केला होता. यानंतर दोन वेळा ट्रॉलीभर दारू याच महिलांनी पोलिसांना पकडून दिली होती आणि या दारु तस्करावर मोठी कारवाई झाली.

यानंतर या गावात दारुविक्रिला लगाम बसला तरीही महिला शांत राहिल्या नाहीत. त्यांची नियमित अहिंसक कृती सुरू असते. त्यांच्यामुळे अख्ख्या जिल्ह्यातील दारूचे नेटवर्क तुटले होते. पोलिस दलाने त्यांना केलेल्या मदतीच्या जोरावर त्या इतकं काम करू शकल्या. स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी त्यांचे गाव दारुमुक्त केले आहे.

आज जेंव्हा गडचिरोली दारूबंदी हटवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे, सरकारने तसे पावलं उचलायला सुरुवात केली आहे, अशा स्थितीत माझं मन अतिशय चिंताग्रस्त आहे. मुरुमगाव ही केवळ एका गावाची कहाणी.... एका धानोरा तालुक्यात अशी पन्नास गावे आहेत. ज्यांच्या अशाच संघर्षाच्या कहाण्या आहेत. आज जर सरकारने दारू सुरू केली तर या महिलांनी केलेल्या कामाचे काय ? पोरगा दारू पितो नवरा दारू पिवून मारतो, घरात पैसे देत नाही. घरातील तांदुळ विकतो अशा केवळ तक्रारी न करता पुढे येऊन दारूबंदी केलेल्या या महिलांचा विचार सरकारने करायला हवा. हा विचार जर सरकारने केला नाही तर आम्ही या सर्व महिलांना घेऊन या सरकार विरोधात अहिंसक कृती करायला सज्ज आहोत.

Tags:    

Similar News