काळरात्र : पाऊस आणि रस्त्यावरची ती दोन प्रेत!
24जुलै ची ती काळरात्र.. साताऱ्या जवळच्या लिंब फाट्यावर एक भयंकर अपघात घडलेला.. एका मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न चक्काचूर झालेलं.. या अपघातात तिने तिचे आजोबा आणि गाडीचा ड्राइवर दोन्ही गमावलेलं... रात्री 12 चा सुमार असेल! कोणीतरी त्या चक्काचूर गाडीतून 2 प्रेत रस्त्याच्या कडेला ठेवली आणि निघून गेले.. आता फक्त चार जण होते ‘ती’, प्रचंड पाऊस आणि दोन प्रेत!;
सांता बाबा तु फ़िरत असतो ना सगळ्यांना गिफ्ट वाटत!माझं ऐकशील!अगदी मनापासून माझी इच्छा तुला सांगतेय! प्लीज ती पूर्ण कर! माझ्या सुषम ला जाऊन एकदा thank you म्हण माझ्या साठी.. दर क्रिसमसला तीच्या आठवणींनी मी कासावीस होते. मुळात मी आता कोणालाच नाताळच्या शुभेच्छा देऊ शकत नाही..
सुषम माझ्या आयुष्यात पुन्हा आली ती कदाचित सांता क्लाज म्हणूनच... कारण सांता हा जर देव आहे तर तु माझ्या आयुष्यात पुन्हा देवाच्याच रूपाने आलीस ना..
24जुलै ची ती काळरात्र.. साताऱ्या जवळच्या लिंब फाट्यावर एक भयंकर अपघात घडलेला.. एका मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न चक्काचूर झालेलं.. या अपघातात तिने तिचे आजोबा आणि गाडीचा ड्राइवर दोन्ही गमावलेलं... रात्री 12चा सुमार असेल! कोणीतरी त्या चक्काचूर गाडीतून 2 प्रेत रस्त्याच्या कडेला ठेवली आणि पोलिसाची नसती बिलामत नको म्हणून निघून गेले.. कोसळणारा पाऊस आणि रस्त्यावर ही दोन प्रेत!
हायवे असून कोणी थांबायला तयार नाही, ती 16-17वर्षाच्या मुलीची घाबरून जाण्यापलीकडची अवस्था... तेवढ्यात कोणीतरी ऍम्ब्युलन्स पाठवली, पोलीस आले त्यांनी त्या मुलीला कोणी नातेवाईक जवळपास आहेत का? हे विचारले आणि अगदी अचानकच जणु चमत्कार झाला.. त्या मुलीला साताऱ्यात आपल्या बरोबर महिनाभर हॉस्टेल ला असलेल्या एका मुलीची आठवण झाली, ती साताऱ्यालाच राहत होती बहुतेक.. आणि तिचे वडील साताऱ्यात कोणीतरी मोठे व्यक्ती होते... नाव आठवून सांगितलं आणि पोलिसानी नंबर शोधून काढला.. पुढे अगदीच अनोळखी असलेल्या कुटुंबाकडून त्या मुलीला मिळालेली मदत अनमोल होती... त्या दोन्ही प्रेतांना व्यवस्थित घरी रवाना करेपर्यंत पोलिसाची पूर्ण मदत या कुटुंबाने केली.. एका ख्रिस्ती कुटुंबाने सांता बनून या मुलीला मदत केली.. माणुसकी चा नवा अध्याय सुरु झाला..
सांता खुप उपकार आहेत या कुटुंबाचे माझ्यावर.. आणि मग प्रत्येक नाताळ च्या दिवशी या मराठी कुटुंबात ही नाताळ साजरा व्हायला लागला..
गेल्या वर्षी सुषम कॅन्सर ने गेली आणि सगळा माझा उत्साहच संपला.. सांता भेटशील का pls सुषम ला? मी खुप आठवण काढते तिची!सांग तिला आणि हे पण सांग मी चर्च मध्ये जाऊन तिला शुभेच्छा देते त्यावेळी आम्ही दोघी च असतो.. आम्ही खुप खुप हसतो आणि तिच्या style मध्ये ती म्हणते 'गधडे मोठी हो जरा '!
- नेहा पुरव
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)