कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे भले मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यावेळी उदरनिर्वाह कसा चालवावा याची अनेकांना भ्रांत आहे. यात काहीजणांची तर उपासमारही सुरू आहे. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी झेप फाउंडेशन ही संस्था अत्यंत मोलाचे कार्य करत आहे. अंमळनेर व नंदुरबार येथील महिलांचा कौशल्य विकास करून त्यांच्या हाती काम देण्याचे महनीय कार्य ही सामाजिक संस्था करत आहे. संस्थेच्या या कार्यामुळे या महिला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाल्या असून या लॉकडाऊनच्या काळातही संसारातील आर्थिक बाजू मोठ्या सक्षमतेने सांभाळत आहेत.
प्रियांका कांतीलाल पाटील या अशाच एक नंदूरबार येथील महिला. त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी एम ए केले असून त्यांचे डी एड ही पूर्ण झाले आहे. त्यांना या क्षेत्रातील ६ वर्षाचा अनुभव आहे. त्या शिवणकामही करतात. मागील वर्षी त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन जुळ्या मुलीही आहेत. पुढील ५ वर्षे त्यांना काम करणे शक्य नाही. त्यामुळे घरातूनच रोजगार मिळावा अशी त्यांची धडपड चालू होती. त्याच वेळी त्यांना डॉक्टर रेखा चौधरी यांची मदत मिळाली. डॉक्टर रेखा यांनी प्रियांका यांचा कौशल्यविकास करुन मास्क शिवण्याचे काम दिले.
त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळातही त्यांचा रोजगार सुरू आहे. प्रियांका पाटील यांच्या सारख्या अनेक महिला आहेत ज्यांना झेप फाउंडेशनने सक्षम केले आहे. अश्याच एक शितल शरद पटेल. त्या गृहिणी असून गेल्या १० वर्षांपासून शिवणकाम करत आहेत. त्यांनीही त्यांचे डी एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवणकाम करताना त्या शिवणकाम शिकवण्याचेही काम करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांचे पती शरद पटेल शेती व्यावसायिक आहेत. एरवी त्यांचे काम व पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता. पण कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने आर्थिक स्थिती काहीशी नाजूक होत गेली.
घराचे हफ्ते व इतर खर्चासाठी हातात काम नसल्याने अर्थिक प्रश्न उभा राहिला, परंतु या कठीण समयी झेपच्या माध्यमातून त्यांना मास्क शिवणकामचे काम मिळाले त्यातून आर्थिक घडी सावरण्यासाठी मदत झाली आहे. हर्षाली भुषण शिंदे याही अश्याच एक गृहिणी. त्यांचे पती भूषण ‘पटेल जैन इरिगेशन सिस्टीम’मध्ये नोकरीला होते. पण कोरोनाच्या या संकटात त्यांची नोकरी गेली. अखेरीस संसाराचा गाडा चालवण्यासाठी हर्षाली पुढे सरसावल्या. त्यांनाही झेपची मदत मिळाली आणि कौशल्य विकास करून त्यांनाही मास्क शिवण्याचे काम मिळाले.
सारीका रवींद्र पाटील यांचेही झेपमुळे अर्थमान सुधारले. त्या अंमळनेर मधल्या. त्यांच्याकडे शिवण कामाचा ३ वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी एम ए बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे पती शिक्षक आहेत पण एका पगारावर घर चालवणे म्हणजे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती. कठीण झाले होते. घरच्याघरी काही करावे या विचारातून उशीचे कव्हर, रजाई, पायपुसणी, आसने, साडी कव्हर बनवून इतर गरजू महिलांसहित झेपनेच उपलब्ध करून दिलेल्या महिला बाजारात विकू लागल्या. पण लॉकडाऊनमुळे या व्यवसायावरतीही संकट आल्याने झेप तर्फेच त्यांना मास्क बनवण्याचे काम मिळाले. उज्वला पंकज पवार यांच्या आर्थिक उन्नतीतही झेपने मोलाची कामगिरी बजावली.
त्यांचे पती पंकज पवार लॅब असिस्टंट आहेत. उज्वला यांचे ब्युटीपार्लर आणि शिवणकामाचे क्लासेस आहेत. त्यांना दोन मुले आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनाही झेपतर्फे मास्क शिवण्याचे काम मिळून आर्थिक उद्धार झाला. झेप फाउंडेशन ही अशी संस्था आहे जी गेली सात ते आठ वर्षे सामाजिक कार्य करत आहे. नंदूरबार, अंमळनेर आणि परिसरात महिला सक्षमीकरणासाठी फार महत्वाचे कार्य या संस्थेतर्फे केले जात आहे. यासाठी अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. या उपक्रमांमध्ये सर्वात अगक्रमाने नाव घ्यायचे झाले ते महिलांनी तयार केलेल्या आणि महिलांतर्फे विकल्या जाणाऱ्या महिला आठवडी बाजाराचे.
यामध्ये महिलांतर्फे अनेक उपयोगी वस्तू बनवल्या जातात आणि विकल्या जातात. याचबरोबर या वस्तू बनवण्यासाठीच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाते. शिवणालय लायब्रेरी हा असाच एक अभिनव उपक्रम ज्यात लायब्रेरीमध्ये तीन चार शिवणयंत्र ठेवलेली आहेत. ज्या ग्रामीण महिलांकडे शिवणयंत्र नाहीत त्या या यंत्रावर निःशुल्क काम करू शकतात आणि आपल्या संसाराला हातभार लावू शकतात. अशा पद्धतीने महिला सक्षमीकरण कार्यात झेप या संस्थेचे उंच झेप घेतली आहे.