शेतकरी महिला झाल्या उद्योजिका, स्वतः उत्पादन निर्मिती करून करतायत व्यवसाय
आपण सर्वांनी एकीचं बळ ही गोष्ट ऐकली किंवा वाचली असेल. कुठेही गेलं तरी ही एकी कामात येते आणि माणूस त्याचा उत्कर्ष सहज साध्य करतो. अशाच प्रकारे जर महिला एकत्र आल्या तर त्या काय काय करू शकतात याची आपण कल्पनाच न केलेली बरी. याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये दहा महिला एकत्र आल्या आहेत. मूल तालुक्यातील डोंगरगावातील प्रगतशील गटाच्या महिलांनी रोजगाराच्या शोधात वणवण भटकंती त्यांनी टाळली. अन स्वतःचाच रोजगार उभा केला. या महीला गांडूळ खताची निर्मिती करतात. त्यांच्या या खताची मागणी वाढली आहे. यातून या महिलांना बऱ्यापैकी नफा होत आहे.
औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख! मात्र या जिल्हात रोजगाराची बोंब कायम आहे. रोजगार देणारं सर्वात मोठ क्षेत्र म्हणजे शेती. सलग सहा महिने शेतीच्या माध्यमातून महिला मजूर, पुरूष मजूरांना रोजगार मिळतो. धान, कापुस निघाला की हात रिकामे होतात. अशात रोजगाराचा शोधात मजूर भटकंती करतात. मात्र मुल तालुक्यातील डोंगरगाव या आदर्श गावातील महीलांनी रोजगाराचा शोध न घेता स्वतःचा व्यवसाय उभा केला. येथील प्रगशील गटाने गांडूळ खताची निर्मिती केली. त्यासाठी गटाने PSW च्या माध्यमातून फिरता निधी उपक्रमातून निधी मिळविला. तयार गांडूळ खत दहा रूपये प्रति किलोने विक्री केला जाणार आहे. सध्या रासायनिक खत टाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सेंद्रिय शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत. त्यामुळे गांडूळ खताची मागणी वाढली आहे. यातून गटाला पर्यायाने महिलांना चांगलं उत्पन्न मिळतंय. शेती व्यतिरीक्त आम्हाला काही रोजगार नव्हता आता या गांडूळ खतामुळे एक चांगला रोजगार मिळाला आहे. आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी या रोजगाराचा नक्कीच हातभार लागेल. असा विश्वास गटातील महीलांनी व्यक्त केलाय.