Independence Day Special : ९० दिवसांत ५७ गुन्हे सोडवणारी लेडी सिंघम ज्योती क्षीरसागर
स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकाचा मान मिळाला आहे. यात एका राजकीय वादातून झालेल्या खुनाचा तपास करुन 17 जणांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी ज्योती क्षीरसागर यांचाही समावेश आहे.
ज्योती क्षीरसागर या मुळच्या हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव इथल्या. लहानपणापासून परिस्थिती अतिशय जेमतेम. आई वडील दोन भाऊ आणि ज्योती असा यांचा परिवार. परिस्थिती जेमतेम असल्यामुळे ज्योतीचं शिक्षण राहत्या गावीच झाल. तेथून पुढच्या शिक्षणासाठी ज्योती कोल्हापूरला आली.
कॉलेज जीवनापासून ज्योती यांना समाजसेवेची आवड. त्यांनी तेव्हापासूनच समाजसेवेचे काम स्वीकारले. कॉलेज जीवनात त्यांनी जागृती युवा मंच या नावाने ग्रॅज्युएट मुलींचा संघ स्थापन करून त्या अंतर्गत वाठार तर्फ वडगाव येथे महिलांचे वोटिंग घेऊन गावाची दारूबंदी केली. स्त्रीभ्रूण हत्या, महिलांची ग्रामसभा इत्यादी उपक्रम सुरु केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत त्यांच्या गावाला पुरस्कार प्राप्त झाला आहे.
बॅचलर इन फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या क्षेत्रात डिग्री करिता तिने शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट झाली. त्यानंतर सुरू झाला तिच्या जीवनाचा प्रवास. एमपीएससी सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करत इतर परीक्षा देत ती 2009 साली नाशिक ट्रेनिंग नंतर डी वाय एस पी या पदावर ती रुजू झाली.
पुढे तिची नियुक्ती बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी झाली. गेवराई येथे आहेरनांदूरच्या गोदावरी पत्रात महाराष्ट्रातील सर्वात मोठा छापा टाकला त्यात 45 ट्रक, 8 बोटी, 7 जेसीबी जप्त केल्या सोबतच 25 मजूरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 35 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. गेवराई मध्येच घाडगे खून प्रकरण, जदिद जावळे बलात्कार प्रकरण अशी अनेक मोठी प्रकरणे स्वतः सोडवली. वेश्या व्यसयांवर छापा टाकून गुन्हेगारांवर वचक बसवला.
याच भागामध्ये कम्युनिटी पोलीसिंग मध्ये एक गाव एक गणपती, व्हिलेज पंचायत पोलीस ऑफिसर (VVPL) , ग्रामसुरक्षा दल उपक्रम राबवून चोरी दरोडा यांना आळा घालून सामाजिक सलोखा स्थापन करत कायदा सुव्यवस्था अत्यंत चोखपणाने बजावली. याच दरम्यान त्यांनी महत्वाचे खुनाचे दरोड्यांचे तपासही केले. यातील अनेक गुन्हेगार सध्या शिक्षा भोगत आहेत. त्यातीलच एका गुन्ह्याबद्दल पोलीस महासंचालक यांचा हस्ते बेस्ट अन्वेशण उत्कृष्ट दोषसिद्धी याबद्दल गौरविण्यात आले आहे.
2016 साली त्यांची गुन्हेशाखा सी आय डी (CID) मध्ये पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तिने 100 पेक्षा जास्ती प्रकरणे हाताळली. 57 गुन्हे 90 दिवसात सोडविण्यात यश मिळवले. सध्या त्या पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, तासगाव जि. सांगली येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.