रोहित पवार यांची फॅशन डिझायनर बहिण...

Update: 2020-07-11 02:11 GMT

प्रसिध्द फॅशन डिझायनर निवेदिता साबू या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बहिण आहेत. हे फार कमी लोकांना माहिती असेल. या फॅशन डिझायनर बहिणीचं अभिनंदन करण्यासाठी रोहित पवार यांनी एक फेसबूक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी. निवेदिता साबू यांचा या क्षेत्रातला प्रवास सांगीतला आहे.

 

वाचा काय म्हणाले रोहित पावर...

फॅशन डिझाईन हे क्षेत्र हे जसं झपाट्याने विस्तारतंय तशा त्यात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतायेत. पण वीस वर्षांपूर्वी वयाच्या १९ व्या वर्षी निवेदिता साबू या माझ्या बहिणीने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज एक जागतिक दर्जाच्या फॅशन डिझाइनरपर्यंतचं वर्तुळ तिने यशस्वीरित्या पूर्ण केलं, याचा एक भाऊ म्हणून मला निश्चितच अभिमान आहे.

आज बहिणीच्या व्यवसायाबद्दल सांगायचं कारण म्हणजे संपूर्ण जग 'लॉक डाऊन'मध्ये असताना फक्त कारागिरांच्या हाताला काम मिळावं म्हणून तिने आपला 'मोर्चा मास्क' निर्मितीकडे वळवला. तिथंही आपलं कौशल्य दाखवून जागतिक दर्जाचा मास्क तयार केला हे कौतुकास्पद आहे. या फॅशनेबल मास्कलाही अनेक पुरस्कारांची चंदेरी झालर मिळाली, ही अधिकच आनंदाची गोष्ट आहे.

२००० साली दिल्लीच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) या फॅशन डिझाईन क्षेत्रातील नामांकित संस्थेतून फॅशन डिझाईनमध्ये सुवर्णपदक घेऊन बाहेर पडल्यानंतर तिने मागं वळून पाहिलंच नाही. सुरवातीच्या काळात अरविंद, एरो, ली, रेंगलर या आतंरराष्ट्रीय ब्रँडमध्ये सर्वांत तरुण हेड डिझाइनर म्हणून काम केलं. नंतर स्वतःचा निवेदिता साबू कोचर हा ब्रँड लाँच केला. शिवणकामाची एक मशीन आणि एक टेलर यापासून सुरू झालेल्या तिच्या कंपनीचा प्रवास अलौकिक बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कुशलता या बळावर आज एका आंतरराष्ट्रीय ब्रँडपर्यंत येऊन पोचला आहे. आज दोनशेपेक्षा अधिक कुशल कारागिर तिच्याकडं काम करतात. फॅशन डिझाईन क्षेत्रांत काम करत असताना ग्राहकांची आवड, जीवनशैली आणि गुणवत्ता यामध्ये तिने तसूभरही तडजोड केली नाही. म्हणूनच पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कल्याणीनगर तर मुंबईत जुहू तारा रोड इथे आलिशान दालन ती सुरू करू शकली. आजपर्यंत १८ हजारहून अधिक डिझाईन तिने तयार केलेत.

फॅशन डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा भारत गौरव पुरस्कार, सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित पुरस्कारांवर तिच्या नावाची मोहर उमटली. माझ्या बहिणीच्या यशाचा हा चढता आलेख माझ्यासाठी अभिमानाची बाब आहेच पण या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवांसाठीही एक आदर्श उदाहरण आहे, यात काही शंका नाही.

Similar News