‘मला गडावरुन पंकजा दिसते’ असं गोपीनाथ मुंडे का म्हणाले होते हे आता समजलं असेल
भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर महाराष्ट्रात राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. विशेषतः ओबीसी समाजाचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांच्या कन्या पंकजा पुढे आल्या आणि राज्याला एक सक्षम महिला नेतृत्व मिळालं.
मुंडेंच्या अंत्यसंस्कारावेळी अतिशय भावनिक आणि आक्रमक झालेल्या जमावाला त्यांनी आपल्या शब्दांनी शांत केलं. आपल्या वडीलांच्या पार्थिवाला अग्नी दिला. एका मुलीनं वडीलांचे अंत्यसंस्कार करण्याचा हा निर्णय अतिशय धाडसी होता. यासाठी त्यांचं सर्व स्तरांतून कौतूक झालं.
गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा पंकजा राजकारणात येऊन फार काळ झाला नव्हता. तरीही त्यांनी मोठ्या हिंमतीनं वडीलांच्या राजकारणाचा वारसा हातात घेतला. ‘मुंडें साहेबांचा प्रवास बैलगाडी ते हेलिकॉप्टर असा झाला, माझा प्रवास हेलिकॉप्टर ते बैलगाडी असा असेल’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंकजांची ‘संघर्ष’ यात्रा
लोकसभा निवडणुकांनतर राज्यात लगेचच विधानसभेची निवडणूक होती. त्यासाठी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली आणि सत्तापरिवर्तनाचा निर्धार केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी दौरा केला. ठिकठिकाणी सभा घेतल्या. मतदारांमध्ये जात भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं अवाहन केलं. त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’दरम्यान पंकजांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्यातल्या बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. आणि त्यांच्या या यशात पंकजांचाही वाटा महत्वाचा राहीला.
‘संघर्ष यात्रे’मधून पंकजांनी राज्यव्यापी नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केलं. वडील गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर सैरभैर झालेल्या ओबीसी समाजाला त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी बांधून ठेवलं. राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असणार हे स्पष्ट होतं. केंद्रात गोपीनाथ मुंडेंकडे असलेल्या ग्रामविकास खात्यासोबत महिला बालकल्याण खात्याचाही कारभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्यातही त्यांनी आपल्या कामाची जादू दाखवली.
मुंडे घराणं आणि भगवानगड
गोपीनाथ मुंडेंची भगवानगडावर अपार श्रद्धा होती. दसऱ्याला ते गडावरुन लोकांना संबोधित करायचे. आपले अनेक राजकीय निर्णयही त्यांनी भगवानगडाहूनच घोषित केले. पंकजा आपल्या राजकीय वारस असतील हे ही त्यांनी गडावरुनच स्पष्ट केलं होतं. त्यांच्या निधनानंतर पंकजा आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज यांच्यात वाद झाला आणि गोपीनाथ मुंडेंच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाली. आपल्या वडीलांप्रमाणे दसऱ्याला समाजाला संबोधित करण्यासाठी त्यांनी संत भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव इथं दसरा मेळावा भरवला. तिथं जमलेल्या प्रचंड जनसमुदायानं पुन्हा एकदा पंकजांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.
ग्रामिण भागात आजही मुंडे नावाची जादू कायम आहे. गोपीनाथ मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे. त्यांना पंकजांमध्ये मुंडे साहेबांची छबी दिसते. या वर्गाला आपलंसं करण्यात पंकजांना यश आलं. अर्थात सत्तेत असल्यानं त्यात मर्यादाही होत्या. पण सगळी आव्हानं यशस्वीरित्या पेलून त्या वाटचाल करत आहेत. ‘मी असेपर्यंत गोपीनाथ मुंडेंचं नाव मी जगाला विसरु देणार नाही’ हे त्यांचं वक्तव्य बरंच काही सांगून जातं. त्यांच्या जोडीला आता त्यांच्या भगिणी डॉ. प्रीतम मुंडेही आल्या आहेत. मुंडेंच्या निधनानंतरची पोटनिवडणूक आणि 2019 ची लोकसभा अशा दोन्ही वेळेस मोठ्य़ा मताधिक्यानं त्या निवडून आल्यात.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मारली बाजी
आताच्या लोकसभा निवडणुकीतही पंकजांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. परंपरेप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसनं यंदाही बीडची लढत प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही पक्षांकडून आक्रमक प्रचार केला गेला. अखेरच्या टप्प्यात अगदी जातीवर प्रचार नेण्यात आला. सगळ्या आव्हांनांना मुंडे भगिणी पुरुन उरल्या. ही लढत प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी नव्हती तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अशी होती. त्यात पुन्हा एकदा पंकजांनी बाजी मारलीय. दोन्ही भगिणी आपल्या वडीलांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत हे नक्की.