अफगाणिस्तानातल्या पश्चिमेकडच्या हेरत प्रांतात राहणाऱ्या राबियाला ताप होता. ती डॉक्टरांकडे गेली. तिला कोव्हिड-19 आजार झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. ताप आणि अंगदुखीने बेजार राबिया घरी परतली. डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन नवऱ्याच्या हातात देत तिने औषधं आणायला सांगितली. नवऱ्याने प्रिस्क्रिप्शन बघितलं तर त्यावर राबियाचं नाव लिहिलं होतं. तिचं नाव बघून नवरा संतापला आणि त्याने राबियाला मारहाण करायला सुरुवात केली. राबियाचा गुन्हा एवढाच की, तिने तिचं नाव डॉक्टरला म्हणजे एका परपुरूषाला सांगितलं होतं.
वाचायला थोडं विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. कारण, अफगाणिस्तानात स्त्रियांनी स्वतःचं नाव परपुरषाला सांगू नये, अशी प्रथा आहे. स्त्रियांनी परपुरुषाला स्वतःचं नाव सांगणं संस्कृतीविरोधी मानलं जातं.
या कुप्रथेला आता अफगाणिस्तानात विरोध होताना दिसत आहे. यासाठी अफगाणिस्तानातल्या काही स्त्रियांनी Whre is my name? या नावाने मोहीम उघडली आहे. अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी #WhereIsMyName? ची पोस्टर्स दिसतात. सोशल मीडियावरही या मोहिमेची चर्चा आहे. विशेष म्हणजे तिथल्या सेलिब्रिटींनी देखील या मोहीमेला पाठिंबा दिला आहे.