कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, ट्विटरची ब्ल्यू टिक हटवल्याने तेजस्विनी पंडितची सरकारवर टीका

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटरची ब्ल्यू टिक काढण्यात आली. त्यावरून तेजस्विनी पंडित संतप्त झाली असून यामागे सरकारचा हात असल्याची टीका केली आहे.;

Update: 2023-10-11 03:58 GMT

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटरची ब्ल्यू टिक हटवण्यात आली. त्यावरून तेजस्विनी पंडितने सरकारवर टीका करत कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, अशी टीका केली आहे.

माझ्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझे स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्ही जनतेची’ इतकी वर्षे फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? असा प्रश्न तेजस्विनी पंडितने उपस्थित केला आहे.

ट्विटर अकाऊंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणांसाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा जय हिंद जय महाराष्ट्र साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील.

सत्तेत कोणी का बसेना, आम्ही जनता आहोत. जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच, जय हिंद जय महाराष्ट्र, असं म्हणत तेजस्विनी पंडितने ट्वीट केलं आहे. तर या ट्वीटला महाराष्ट्र, टोलधाड, लोकशाही धाब्यावर आणि नो डेमॉक्रसी हे हॅश टॅग वापरण्यात आले आहेत.

याआधीही तेजस्विनी पंडित यांनी देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट करून महाराष्ट्राची फसवणूक होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच राज ठाकरे तुम्हीच आता काय ते करा, अशी विनंती तेजस्विनी पंडित यांनी केली होती. त्यानंतर आता तेजस्विनी पंडितच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक काढण्यात आल्याने यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र तेजस्विनी पंडितच्या ट्विटरची ब्ल्यू टिक का काढली? याची अधिकृत माहिती ट्विटरकडून समोर आली नाही.

Tags:    

Similar News