"मी प्रेरणा सयाजीराव पाटील साने, ईश्वर साक्ष शपथ घेते की…", रानबाजार वेबसिरीजचा पहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज!
गेल्या आठवड्यात १५ मेला मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अतिशय बोल्ड टीझर अपलोड झालेली रानबाझार वेबसिरीज प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय ठरलीये. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अतिशय बोल्ड टीझर्स नंतर रानबाजार या बेवसिरीज चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अतिशय बोल्ड टीझर्सने मराठी सिनेविश्वात एकच खळबळ माजवली होती. या टीझर्समध्येच ट्रेलर १८ मे ला रिलीज होणार असल्याचं सांगितंल गेलं होतं. त्या प्रमाणे प्लॅनेट मराठीच्या युट्यूब चॅनेलवर हा ट्रेलर नुकताच काही वेळे पुर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये मराठी सिनेविश्वातील मोठमोठे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, सुरेखा कुडची, उर्मिला कोठारे – कानिटकर, माधुरी पवार या अभिनेत्रींसह मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनापुरे, अनंत जोग, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अंबर हडप, अभिजीत पानसे आणि जयंत सावरकर ही भली मोठी स्टार कास्ट आहे.
मराठी सिनेविश्वातील हा मोठा प्रकल्प मानला जात असून वळू, देउळ नंतर पहिल्यांदाच एखाद्या कलाकृतीत इतकी तगडा स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रेलर वरून तरी ही वेबसिरीज एक राजकीय थरार पट असणार असल्याचं दिसत आहे. सत्तेच्या खुर्ची साठी राजकारण किती खालच्या पातळीवर केलं जातं हे दाखवलं जाण्याची शक्यता आहे. येत्या २० मे पासून म्हणजे अवघ्या दोनच दिवसांच्या अवधीनंतर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २० मे ला दुपारी १ वाजल्यापासून ही वेबसिरीज आपल्याला पाहता येणार आहे. असंच काहीसं घडलं होतं... कदाचित? या कॅप्शन खाली रानबाजार ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीज चे दिग्दर्शन अभिजीत पानसे करणार असून निर्मिती अक्षय बर्दापुरकर आणि प्लॅनेट मराठी ने केली आहे. आता नेमकं काय घडलं होतं हे येत्या २० तारखेलाच कळेल.