घरकाम करणं फक्त गृहिणींची नाही, तर पुरूषांची देखील जबाबदारी: मुंबई हायकोर्टाचं मत!
X
भारतात स्त्री-पुरूष समानता हा सर्वात महत्वाचा विषय आहे. देशातील समाज व्यवस्थेत पुरूषांना अधिक महत्वाच स्थान असल्याची मानसिकता आहे. स्त्रीयांनी घराची काळजी घेणे आणि पुरूषांने पैसा कमावून आणणे हिच शिकवण मुला-मुलींना लहानपणापासून देण्यात येते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात न्याय देताना घरकाम करणं ही फक्त गृहीणींची नाही, तर पुरूषांची देखील जबाबदारी असल्याचा निर्णय दिला आहे.
काय होतं प्रकरण?
एका पतीने सकाळी पत्नीने चहा द्यायला नकार दिल्यामुळे तिची डोक्यात हातोडा घालून हत्या करत, पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्याच रक्ताने आंघोळ केली. हा सर्व प्रकार घडत असताना या जोडप्याची सहा वर्षाची मुलगी पाहात होती. न्यायालयात या प्रकरणात या मुलीने दिलेली साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने या आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठा समोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. 'पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. लग्न हे सन्मान आणि समानतेच्या आधारावर आधारलेलं आहे. या प्रकरणात ही गोष्ट कुठेही आढळत नाही. या गोष्टी लैंगिक असमानता आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. समाज आणि संस्कृतीमध्ये आढळणाऱ्या या गोष्टी वैवाहिक नातेसंबंघात देखील आढळतात. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणं चुकीचं आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती - पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. अनेकदा महिलांची सामाजिक परिस्थिती देखील याला कारणीभूत असते. या परिस्थितीमुळे महिला स्वत:ला जोडीदाराकडे स्वाधीन करतात. त्यामुळे पुरुषांना आपण प्रमुख असून पत्नी ही आपली मालमत्ता असल्याचा भ्रम निर्माण होतो.' असे ताशेरे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी ओढले आहेत.