Home > W-फॅक्टर > कुंचल्याची नजाकत पाहून लेखणीही सुखावली !

कुंचल्याची नजाकत पाहून लेखणीही सुखावली !

कुंचल्याची नजाकत पाहून लेखणीही सुखावली !
X

गेल्या चार-पाच दिवसांपासून घरात 'कुछ तो गडबड है !' हे मला जाणवू लागलं होतं. लाईट बिलाचा कागद कुठाय, असं विचारल्यावर 'तो कॅनव्हास ना.. कपाटाच्या कप्प्यावर ठेवलाय बघा,' असं असंबंद्ध उत्तर 'हि'च्याकडून मिळालं.

'ग्रे कलरचा माझा शर्ट कुठाय ?' या माझ्या प्रश्नावर वेगळंच वाक्य कानावर पडलं,' क्ले म्हणताय का.. ते तर ड्रॉवरमध्ये आहे की व्यवस्थित.'

सकाळी दात घासताना नवीन ब्रश मागितला, तेव्हा हिनं सांगितलं,' त्या ब्रशला कलर तस्साssच लागून राहिलाय.' आता दात घासण्याशी रंगाचा काय संबंध, हे मी माझ्याच मनाला विचारत फ्रेशरुममधल्या आरशात स्वतःचे दात उगाचंच किमान चार-पाच वेळा तरी सर्व अँगलमधून बघितले.

अँगलवरुन आठवलं. काल टीव्हीवर कुठला तरी जुना थ्री डी पिक्चर लागलेला. मी आपलं सहज बोलून गेलो,' छ्या ss थ्री डी मुव्ही बघण्याची मजा मल्टी फ्लेक्समध्येच ,'.. त्यावर हिचं उत्तर काय तर,' बाईच्या हातातलं टोपलं थ्री डी इफेक्टमध्ये खरंच छान दिसतं होss'

स्साला.. आपल्या घरात चाललंय तरी काय, हेच कळेना मला. कॅनव्हास काय.. क्ले अन् ब्रश काय.. आता तर थ्री डी काय.. सारंच माझ्या डोक्यावरुन चाललेलं. मात्र आज सकाळी या साऱ्या गुपितांचा उलगडा झाला. 'मॉर्निंग टी'साठी डायनिंग टेबलाजवळ आलो, तेव्हा हिनं डोळे मिटायला सांगितलं. मी मिटले. त्यानंतर मी डोळे उघडून बघतो तर काय.. एक सुंदर म्युरल पेंटींग माझ्या नजरेला पडलं. बारीकसारीक रंगसंगतीचीही नाजूक अदाकत संपूर्ण चित्रात प्रकटलेली. थ्री डी इफेक्टमुळे कॅनव्हासवरच्या तिघी जणू थेट माझ्याशीच संवाद साधताहेत, असा क्षणभर भास झाला. 'हे आर्ट मी तयार केलंय,' हे तिनं हळूच कानात सांगितलं. मी कौतुकाश्चर्यानं पाहातच राहिलो. गेल्या चार दिवसांतील गंमती-जंमतीचाही झटकन उलगडा झाला.

'मुलं आता आपापल्या संसारात रमलीत. म्हणूनच मीही बत्तीस वर्षानंतर माझ्या जुन्या कलेकडं वळालेय होss. फक्त तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून मी तुम्ही ऑफिसला गेल्यावर गुपचूप हा प्रयोग करत राहिले,' हे तिच्याकडून ऐकताना अभिमानानं उर भरुन आला.

आपण नुसते एका 'स्त्रीचे पती' नसून एका 'ग्रेट कलाकाराचे लाईफ पार्टनर' आहोत, या जाणिवेनं माझी लेखणीही भारावून अशी लिहिती होत गेली. कित्ती कित्ती छान ना...

  • सचिन जवळकोटे

लेखक लोकमत वृत्तसमुहाचे निवासी संपादक आहेत...

Updated : 4 July 2020 6:27 AM IST
Next Story
Share it
Top