निवृत्ती देशमुख-इंदुरीकर बाई म्हणजे विनोद, मनोरंजन नव्हे !
X
"चप्पल कितीही भारी झाली म्हणून आपण गळ्यात घालतो का? बायको आहे ती. मापात असावं."...“तुमची जनावरं(महिलांना उद्देशून) नीट सांभाळा”... “मांजर किती पिलांना जन्म देते अन् हिंडायला फिरायला लागते. पण बायका माझं हे दुखतय अन ते दुखतय करतात”..."नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली, अरे खानदान तपासा आपले"... "पोरगी फटकावली पाहिजे."... “आता यांनी फेटे बांधायला सुरुवात केली. आम्ही घालतो गाऊन...”... “बचत गटात भाषणं करायला लागली म्हणून काय लई शहाणी झाली का?”..."च्युत्या”...
देशमुखजी, आपल्या नावापुढे ‘महाराज' उच्चारण्यापूर्वी ही सगळी वाक्य कानात गुंजतात. आणि मग ‘महाराज’ हे पद तुमच्या नावासमोर लावण्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभं राहतं. खरं तर ज्या वाक्यामुळे तुमच्याविरोधात तक्रार दाखल झालीये ते वाक्य तुमच्या ‘विनोदी’ संभाषणापैकी (कीर्तन म्हणावे का?) त्यातल्या त्यात सौम्य आहे., यापेक्षा अधिक गंभीर शब्द तुमच्या संभाषणात असतात. प्रत्येक कीर्तनात कुणालातरी हिणवणे, विशेषत: महिलांबद्दल अपशब्द वापरणे याशिवाय तुमचे संभाषण पूर्ण होत नाही. आता तुमचे समर्थक “प्रबोधनात भाषा कठोर असते, भाषेला बाजाची मर्यादा नसते, भाषा आजची असावी” वगैरे समर्थन करु शकतात. रांगडी भाषा तर तुकोबांची परंपरा. पण ती नैतिक ताकदीची होती. आपली वाणी ही त्या परंपरेतली नाही. भाषा कालानुरुप असावी ना. पण ती नामदेवाच्या ओव्यांसारखी. तुम्ही जी भाषा वापरता, जे मुद्दे मांडता ते कुठेही कीर्तन परंपरेत किंवा वारकरी संप्रदायात बसत नाही. तुमच्या भाषेत पुराव्यासहच सांगायच झालं तर 'पराविना नारी रुक्मिणीसमान'. इथे परस्त्री, स्त्री ही रुक्मिणीसमान आहे. मग अशा रुक्मिणीला आपण सतत अशा भाषेत हिणवणार? आपल्या कीर्तनाचा बहुतांश भाग हा कुणालातरी हिणवणारा, थरहीन असतो. त्यात स्त्रियांना, माऊल्यांना ऊठसूठ अपमानित करणारा भाग अधिक असतो. यात तुमचा दोष नाही देशमुखजी. कीर्तनकारांना शक्यतो उपप्रश्न न विचारणाऱ्या या माझ्या समाजाचा आहे. आमच्या आया-आज्ज्या-पंज्यांनी तर जन्मोजन्मात आपल्याला मिळणाऱ्या हीन वागणुकीविरोधात कधी ब्रसुद्धा काढला नाही हो. या विठ्ठलाचा उद्घोषही माझ्या तोंडी कशासाठी माहित्यीये. या विठ्ठलाने कधी मुक्ताबाई, जनाबाईसोबत दुजाभाव नाही केला बरं. आणि या बायांची थोरवीसुद्धा काय सांगावी हो... ‘डोईचा पदर आला खांद्यावरी| भरल्या बाजारी जाईन मी||’ म्हणत बंडखोरी करणारी ती जनाबाई आहे. महिलांना तुच्छ लेखणारे त्याकाळीही होते.जनाबाईलाही कीर्तनकरण्यापासून रोखण्याचा केला गेला. पण जनाबाई त्यांना पुरून उरल्या. त्यांनी ठणकावून सांगितले- ‘हातामध्ये टाळ खांद्यावरील वीणा | आता मज मना कोण करी||’.अहो संत कान्होपात्रा. नायकिणीची लेक. पण वारकरी संप्रदायात ती संत आहे तिच्या विचारांनी. आणि इथे तुम्ही रोज मुलींच्या चारित्र्यावर वाट्टेल त्या शब्दात बरळता. रोज बायांच्या स्वभावावर वाट्टेल ते संभाषण करतात. अहो आपल्या आईच्या वयाच्या महिलांना, आज्ज्यांनासुद्धा तुमच्या टीकेतून तुम्ही सोडलं नाही. बाई म्हणजे काय विनोद नव्हे, मनोरंजन नव्हे !
देशमुखजी या संसारात सर्वात जास्त कुणी सोसलं असलं ना तर ते बाईनी सोसलयं. आणि संसाराला सर्वाधिक शहाणपणसुद्धा या बाईने दिलयं. मग तुम्ही कोण लागून गेलात या सगळ्यांना आपल्या वाईट वाणीने, अंगविक्षेपाने उठसूठ हिणवणारे.
तुमच्या कीर्तनात प्रश्न केवळ बायांचाच प्रश्न नाही बरं का. तर आपल्या सगळ्या विश्लेषणाचाच प्रश्न आहे. “शुद्ध 96 कुळी रक्त आहे हे” हे स्वत:बद्दल मिरवणारी यांसारखी वक्तव्य असतील. किंवा “हिंदूधर्म” हा शब्द विविध वाक्यांमध्ये वापरुन या संप्रदायाला ‘संकुचित’ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा संप्रदाय कुण्या एका जातीचा नाही ना कुण्याचा एका धर्माचा. हा एक वैश्विक विचार मांडणारा संप्रदाय आहे. त्याला संकुचित कऱण्याचा प्रयत्न का केला जातो? “तुका म्हणे नाही जातीसवे काम।ज्याचे मुखी नाम तोचि धन्य।।”...संपूर्ण संतसाहित्यात एकही अभंग नसेल की तो या संप्रदायाला ‘एका धर्मात’ बांधून ठेवतो. याऊलट विश्वाला उद्देशून विचार मांडणारे अनेक अभंग तुम्हाला माहिती असतील. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक’…. ‘वर्णाभिमान विसरली याती। एकएकां लोटांगणी जाती रे। ’… ‘संत तोचि जाणा जगी | दया क्षमा ज्याचे अंगी ||’… ‘रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला’… या सगळ्या ओव्यांमध्ये जगाचा विचार केलेला आहे. “आतां विश्वात्मके देवे । येणें वाग्यज्ञे तोषावें ।“- हे माऊलींचं पसायदान त्यांनी विश्वासाठी मागितलेलं आहे. वैश्विक विचार मांडणारा, अखंड मानवजातीला माननारा हा संप्रदाय आहे. हा संप्रदाय म्हणतो “यारे यारे लहानथोर ! याते भलती नारीनर !”. नारी-नर भेद नाही असं म्हटलयं हो. म्हणजे केवळ मानवजातच नाही तर कुठल्याही प्रकारच्या नरनारीमध्ये मध्ये भेद नाहीये इथे. वृक्षांनासुद्धा सोयरं माननारा हा संप्रदाय.
मला आश्चर्य वाटतं, एकही वारकरी संप्रदायातला थोर माणूस तुमच्यावर जाहीरपणे आक्षेप घेत नाही तेव्हा. आपण आपल्या घरातली चुकीची गोष्ट दुरुस्त करायला आपण का पुढे येत नाही? आपण घाबरतो का बोलायला आणि का?
देशमुखजी आपल्या कीर्तनाच्या पद्धतीवरही तज्ज्ञांकडून खासगीत बोलले जाते. "कीर्तन परंपरेत एक पोशाखाची पद्धत असते. कपाळाला फेटा, गळ्यात उपरणं... तुमची वेशभूषा कशी? शर्टाची बटणं उघडी... शक्य असूनही आपल्या डोक्याला रीतीनुसार फेटा नसणे...हे सगळं कशासाठी? कीर्तन सुरु असताना अनेकदा बगलेत खाजवणे…छाती खाजवणे…वेगवेगळे अंगविक्षेप...हे सगळं अनेकदा खटकणारे आहे." असे बोलले जाते. चला मान्य करुयात की नामस्मरणात कपडे काय किंवा बाकी गोष्टींचा काही संबंध नाही. मग अशा अनेक परंपरांचा उल्लेख आपल्या संभाषणात अनेकदा येतो, तर याचाही विचार करावा लागेल.
"तुमच्या कीर्तनात तुमच्याकडून गायल्या जाणाऱ्या चाली, अभंग...एकही चाल आपण व्यवस्थिपणे पूर्ण किंवा स्पष्टपणे बोललेली नसते. अनेकदा आपल्या गायकांकडून चित्रपटांमधील गाण्याच्या चालीत अभंग गायले जातात." या आरोपातही तथ्य आहेच की. कीर्तनातील अभंगाच्या ओळी अशा पद्धतीने जमलेल्या भाविकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत की त्या लक्षात राहतील, सुस्पष्ट ऐकायला येतील. पण उगाच ‘स्टाईलबाजी’ च्या प्रयत्नात बहुतांश वेळा किर्तनाच्या अभंगाच्या ओव्याच सुस्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही.
कीर्तनाची फार मोठी पंरपरा आहे हो महाराष्ट्राला. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, बनकर महाराज, निवृत्ती महाराज मोरे-देहूकर, बाळासाहेब भारदे ते सर्वांना ज्ञात असे बाबामहाराज सातारकर. आपेकिती गोडवा आहे सांगण्यात. किती मार्मिक विश्लेषण आणि किती रसाळ...! विनोदाची शैली तर अनेकांमध्ये होती आणि आहे. पण त्यात कायम कुणालातरी हिणवण्याचा, अपमान करण्याचा प्रयत्न कशासाठी? वारकरी संप्रदायात कीर्तनाचे आजरेकर, सातारकर इ. जे काही महत्त्वाचे फड आहेत, तिथे तुम्हाला आमंत्रण नसते. कारण त्यांना तुमंच कीर्तन हे परंपरेतलं वाटत नसावं.
खरं तर कीर्तन परंपरेत सध्याच्या घडीला नव्याने आणल्या गेलेल्या अनेक गोष्टी आक्षेपार्ह आहेत. “विनोदाचार्य”, “कीर्तनसम्राट”, “कीर्तनकेसरी”, “रामायणाचार्य” ही बिरुदं खटकणारी आहेत. ही स्पर्धा कशासाठी? वाढत झालेल्या या धंदेवाईकपणावर कोणीतरी अधिकारवाणीने बोलायला हवं. राजकीय क्षेत्राकडून तर याबद्दल अजिबात अपेक्षा नाही. कारण निवडणुकांच्या काळात गर्दी जमवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने गोष्टींचा वापर केला जातोय, हे काही आपल्या डोळ्यांना दिसत नाही?
निवृत्ती देशमुख , तसेच या सगळ्याच गोष्टीवर कुणीतरी बोलायला हवं. चुकीच्या गोष्टींवर बोलणं ही आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. नाहीतर आपण पुढच्या पीढीपर्यंत हेच घेऊन जाणार आहोत का? आणि हा आपल्या संप्रदायाचा अपमान नाही का? याबद्दल वेळीच योग्य पाऊल उचलणं ही आपली जबाबदारी आहे. आता मागे हटू नका. उठा आपल्या वैश्विक धर्मासाठी.
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥
- सोनाली शिंदे