भारदस्त दिसणं आणि असणं खरच सोप्पं असतं का?
X
भारदस्त दिसणं आणि असणं खरच सोप्पं असतं का? यासाठी मायबाप व्हावे लागतात विभक्त. बालपणात मुकावं लागतं कुणाच्या तरी एकाच्या सुखाला, काढावं लागत बालपण उस्ट आणि खरकटं खाण्यावर तुटुन पडावं लागतं गुलाबजामुन धुंडण्याच्या नादात एखाद्या टोपलंभर खरकट्यावर ज्या खरकट्यात तुटुन पडलेला असतो एखाद्याचा दात अन तुम्हाला आयुष्यातील गोडवा अनुभववा लागतो.
शिकण्याचा संघर्ष कानाला हात लावून भोगताना मग कवा शेण काढावं लागतं तर कधी शाळेच्या गणवेशावर पार्ट टाईम नाल्या काढत बेंदाडाचा वास येऊस्तर बसावं लागतं वर्गात तर कधी माय मेजरावर उभी राहुन लग्नाच्या भिती सारवितानी लहान लहान हातानी चिखलाचे गोळे द्यावे लागतात अन मग निटव्यात चहा आन टोपल्यात पाणी प्यावं लागतं.
भोगावे लागातात माईच्या "एकटीचे"फळं कधी बिनबापाचे तर कधी बाराबापाचे म्हणून ऐकावे लागतात शब्द जे करतात मनावर घात. पुस्तकात मन रमवत सहन करावा लागतो पोरगी होण्याचा घरातला खाण्यापिण्यातील रहाण्यातील "भेद".
वयात येताना चुकवाव्या लागतात नजरा ज्या आपल्या छातीवर येऊन धडकण्यासाठी आतुर असतात कधी जातीचा तर कधी "हालाती"चा फायदा उचलण्यासाठी.
भारताच्या पन्नास वर्षाचं सुवर्ण महत्सवाचं वर्णन सांगत काय कमावलं अन काय गमावलं हे सांगावं लागतं भाषणात
अन बक्षीस मिळालेल्या पँडवर तुम्हाला द्यावी लागते परीक्षा अन व्हावं लागत पहिल्या नंबरने पास.
तुमचं प्रचडं प्रयत्नवादी असणं नाही परवडत ईथल्या व्यवस्थेला
कारण ईथे दिसत असतात तुमच्याशिवाय नाल्या तुंबलेल्या अन भिती पडलेल्या......
आणि म्हणुन यासाठी तुमची शीलभंगाची मागणी केलेली असते नाही तर मग पोलीस ठाण्यात काढाव्या लागतात टेबल वर झोपून रात्री जामीनच्या बदल्यात मग दाबु द्यावे लागतात तुम्हांला तुमची "उरं"ज्याची दाबतानाची आग जात असते बरभंडाला अन होत असतो सपनांचा चुराडा विचारावं लागतं मनाला की कुंपण असच शेत खातं काय?.....
हे सहन करत अपघाताने का होईना शिकावी लागते तुम्हाला चळवळ त्यातील मळमळ वळवळ सगळं काही बाबांच्या विचाराने संविधानाच्या साथीने अन बुद्धाच्या करूणेने....
उभं रहावं लागतं तुम्हाला कधी खमकी होऊन तर कधी ठमकी होऊन रहावं लागतं कधी भडक तर कधी धडक लिपस्टिकच्या भांडवली दुनियेत तग धरून मायबहीणीसाठी आणि ज्यांचं माणुसपण हरवलं अशांसाठी
मग भलेही तुम्हाला कोणी वाळीत टाकील कुणी हळत कुंकु लावणार नाही तर कुणी लग्नाला बोलावणार नाही कुणी तुम्हांला मोकार तर कुणी तुमच्या साथीला भाड्या म्हणेल.मुल्ये घेऊन जगतानाचा हा प्रवास मला बिंधास्तपणे करायचा आहे.
सत्यभामा सौंदरमल