लडाख दोन चाकांवर
X
पंछी नदियॉं पवनके झोंके,
कोई सरहद ना इन्हे रोके..
खारदुंगला क्रॉस करून नुब्रा व्हॅलीत येण्याचं प्रयोजनच इन्डो पाक बॉर्डरच्या जवळ जाणं हे असतं. आम्ही नुब्रा व्हॅलीत tents मध्ये राहिलो. हे tents तसे बेसिक असतात. पण त्यांच्यात सोयी सगळ्या असतात. नुब्रा व्हॅलीहून निघून भारत पाकिस्तान बॉर्डरवरच्या टुरटुक -त्याक्षी- थांग ह्या गावांना जाऊन परत आमच्या tents मध्ये यायचं असा त्या दिवशीचा plan होता. रस्ता बराचसा सपाट असणार होता पण २५० किमीचं अंतर पार करायचं होतं. शिफॉन साडी आणि नवरा ह्यांचं घड्याळ आमच्या मागे एक तासच चालत होतं त्यामुळे आम्हाला सगळीकडे जायला उशीर व्यायचा. मुळात लडाख हा वाळवंटी भाग आहे. इथे अक्षरश: दर दहाव्या मिनिटाला निसर्गाचं रूप बदलतं. एक पेन्टिन्ग मागे टाकून दुसरं पेन्टिन्ग बघावं तसं. मध्येच झन्स्कार नदीच्या काठावरून जाणारा सुंदर नागमोडी रस्ता, मध्ये नुसतेच उंचच्या उंच खडकाळ डोंगर. लहानपणी 'मॅकेनाज् गोल्ड' नावाच्या फिल्ममध्ये सोन्याचे डोंगर पाहिले होते, त्यांची आठवण करून देणारे. मध्यचे लांबच्या लांब पांढर्या वाळूचा पट्टा. एखादा रस्ता इतका सुंदर की पाकिस्तानातली प्रिती झिंटा आणि भारतातला शाहरूख खान इथेच 'तेरे लिये हम हैं जिये' असं म्हणत भेटले असतील असं वाटतं. आणि ह्या सगळ्याच्या जोडीला असलेले army base camps. अनेक ठिकाणी थांबायला, फोटो काढायला परवानगी नाहीये. जसजसे आपण बॉर्डरच्या जवळ जातो तशा you are under enemy observation अशा पाट्या दिसायला लागतात.
अंगावर काटा येतो. इथली माणसं बारा महिने चोविस तास enemy observation मध्येच राहतात! हा विचार मनात येतो आणि पुढच्या क्षणी सुंदर रस्त्याचे लाड संपतात. अत्यंत अवघड असा रस्ता, रस्ता नाहीच खरंतर, प्रवास सुरू होतो. टुरटूक गावात जातानाचा शेवटच्या अर्ध्या तासाचा प्रवास करताना दोन तीन वेळा मला माझी जवळची माणसं डोळ्यासमोर आली आणि 'इथून हाती पायी धड परत जाणं' ही आयुष्यातली शेवटची इच्छा वाटायला लागली. बरं होतं असं, की अशा रस्त्यावर तुम्हाला थांबता येत नाही, मागे वळता येत नाही, स्पीडसुद्धा कमी करता येत नाही कारण motion break झाली की मेलात. you just have to keep on going. फायनली थांगला पोहचून बाईकवरून उतरले तेव्हा मटकन काही सेकंद खालीच बसले. माझ्या पाठोपाठ आलेले सगळे कमी जास्त प्रमाणात हादरले होते. बॉर्डरजवळचा रस्ता म्हणून मुद्दाम असाच ठेवला असेल का? माहित नाही. आणि मग समोर पाटी दिसली.. इथे भारताची हद्द संपते! इथून पुढे POK. तिथलाच एक जवान आपल्याला सविस्तर माहिती सांगतो.
दुर्बिणीतून दाखवतो. आपण फक्त थक्क होऊन बघत राहतो. बॉर्डरकडे नाही, त्या army officers कडे. काय मातीची बनली आहेत ही माणसं. मैलन् मैल चिटपाखरू दिसत नसताना मध्येच एका चेक पोस्टवर बसलेले दोन जवान दिसतात. ज्या चढणीवर आम्ही जीव मुठीत घेऊन चढलो त्यावर शांतपणे हातात अंड्यांचा क्रेट घेऊन पायी चढणारा 'एकांडा शिलेदार' दिसतो. हे इथेच राहतात. इथल्या हवेशी जुळवून घेतात. ह्यांची पोरं इथल्यांच रस्त्यांवर दिसणार्या शाळांमध्ये जातात. खूप अस्वस्थ वाटतं ते बघून. आपण कौतुकाने 'मी बॉर्डरवर उभी आहे' असे फोटो काढून घेतो. काय वाटत असेल त्यांना आपल्याकडे बघून! आपल्या लाडावलेपणाची खरंच लाज वाटते. पण हाच तर अनुभव घ्यायला आपण इथपर्यंत आलोय नं. आपल्या comfort zone ' मधून बाहेर पडल्याशिवाय हे सगळं दिसणार कसं! it just makes the whole effort worth it!
प्र.वि.e.cl.
१. सकाळी लवकर निघा. इथे दिवस मोठा असतो. ऊन चढलं की बर्फ़ वितळून रस्त्यावर पाणी साचायला लागतं आणि बाईक चालवणं risky व्हायला लागतं.
२. वाटेत सगळीकडे छोटे ढाबे असतात पण तिथे बेसिकली मॅगी मिळते. बाकी फारसं काही नाही. अंड्याचे काही पदार्थ मिळाले तर. 'बाल्टी' नावाचं सातूच्या जवळ जाणारं एक धान्य इथे पिकतं, त्याची धिरडी किंवा घावन बरे असतात पण सगळीकडे मिळत नाहीत. इथलं 'चाऊमेन' आवडीने खाऊनच दाखवा, मी काहीही हरेन! नॉनव्हेज मिळत नाही. पण साधारण बरी जागा दिसली की थांबा आणि खाऊन घ्या कारण पुढे बराच काळ काही सोयच नाही असंही होऊ शकतं.
३. सर्व ढाब्यांवर washrooms ची सोय असते. इतक्या दुर्गम भागात इतकी बेसिक सोय चांगली करू शकतात लोक, मग आपल्याकडे का नसेल करता येत ही सोय??
४. सलग ९-१० तास अशा रस्त्यावर बाईक चालवण्याची सवय सहसा नसते. त्या दिवशी माझा डावा गुडघा अचानक दुखायला लागला. असं होऊ शकतं हे लक्षात ठेवा.
नुब्राला परत आल्यावर मी त्या दिवशी मुकाट्याने आराम केला कारण दुसर्या दिवशी पॅनगॉन्गला जायचं होतं आणि हा रस्त्यावर खूप पाणी असतं असं अामचा लडाखी सोबती सांगत होता. पॅनगॉन्गबद्दल उद्या..