3D-printed space rocket : जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट फेल..
X
जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट टेरेन-1 बुधवारी केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले. मात्र, कक्षेत पोहोचण्यापूर्वी ते अयशस्वी झाले. कॅलिफोर्निया कंपनी रिलेटिव्हिटीने हे रॉकेट बनवले आहे. त्यात 9 3D प्रिंटेड इंजिन आहेत. रॉकेटमध्ये इंधन म्हणून लिक्विड मिथेनचा वापर करण्यात आला. या चाचणी उड्डाणाला 'गुड लक हॅव फन' असे नाव देण्यात आले होते.
लॉन्च झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ते यशस्वी झाले. यानंतर रॉकेटने MAX-Q टप्पा देखील पार केला, खरंतर ज्यावर सर्वात जास्त भार होता तो टप्पा रॉकेटने नीट पार केला. असे असूनही, क्ले वॉकरने स्टेज 2 मध्ये जाण्यापूर्वी सुमारे 4 मिनिटे आधी वेबकास्टवर एक त्रुटी नोंदवली. यानंतर रॉकेट निकामी झाले. मात्र, ही चूक का झाली याचे कारण समोर आलेले नाही.
तिसऱ्या प्रयत्नात प्रक्षेपित केले..
टेरेन-1 रॉकेट तिसऱ्या प्रयत्नात सोडण्यात आले. यापूर्वी हे 8 मार्च रोजी लॉन्च होणार होते परंतु तापमानाच्या समस्येमुळे ते 11 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर 11 मार्च रोजी इंधनाच्या दाबाच्या समस्येमुळे ते पुन्हा पुढे ढकलण्यात आले. सध्या, लॉन्चच्या वेळी त्यामध्ये क्रू मेंबर किंवा सामान नव्हते. पण हे रॉकेट नंतर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 1 हजार 250 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असेल.
हे रॉकेटचे काही फोटो पहा..
सर्वात मोठ्या 3D मेटल प्रिंटरसह बनविलेले पाहिलं रॉकेट?
हे रॉकेट 110 फूट (33.5 मीटर) लांब आणि 7.5 फूट (2.2 मीटर) रुंद होते. जगातील सर्वात उंच 3D प्रिंटेड असलेलं हे रॉकेट सर्वात मोठ्या 3D मेटल प्रिंटरच्या मदतीने तयार केलं होतं. रिलेटिव्हिटी कंपनीचे उद्दिष्ट ९५% थ्रीडी प्रिंटेड रॉकेट तयार करण्याचे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते बनवण्यासाठी फक्त 60 दिवस लागतात. याशिवाय कंपनी टेरेन-आर रॉकेट बनवत आहे जे सुमारे 20 हजार किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असेल. पुढच्या वर्षी ते लॉन्च होणार आहे.