अखेर न्याय मिळाला! मुलासोबत बोलली? म्हणून निलंबीत केलेली खेळाडू चिली येथे तिरंग्यासाठी खेळणार...
मुलासोबत बोलली म्हणून सातारा जिल्ह्यातील एका महिला खेळाडू ला तिच्या प्रशिक्षकाने निलंबित केलं. मात्र, माध्यमांमधील बातम्यांनी तिला पुन्हा एकदा संधी मिळाली... आणि तिनं त्या संधीचं सोनं केलं... वाचा श्रतुजा मिसाळ चा थक्क करणारा प्रवास...
X
सातारा जिल्ह्यातील कोळकी गावातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील एक बुजरी, अबोल मुलगी - ऋतुजा पिसाळ. कुठलंही पाठबळ नसतांना हॉकी सारख्या अवघड खेळात स्व:कर्तृत्वावर गाव-तालुका-जिल्हा पातळीवर आपली चमक दाखवत महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघात तिनं स्थान मिळवलं. स्थान मिळवलं तेही कप्तान पदाचाच!
फॉरवर्ड पोझिशन म्हणजे अटॅक लाईनची स्टार म्हणजे ऋतुजा. एकदा का ऋतुजाला बॉल मिळाला म्हणजे सर्व डिफेन्स लीलया तोडून ती समोरच्या गोल पोस्ट मध्ये बॉल ढकलून थांबायची. तिने मारलेला रिव्हर्स फ्लिक शॉट आजवर कुठल्याच गोलकिपरने अडवलेला मी पाहिलेला नाही.
दोन वर्षांपूर्वी एका सरकारी अधिकाऱ्याचा इगो दुखावला गेला (खरं तर दुखावून घेतला) आणि त्यातून तिला क्रीडा प्रबोधिनीतून काढून टाकलं. कारण काय तर ती सकाळी ११ वाजता रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवर एका मुलासोबत बोलतांना दिसली म्हणून !
सदरच्या अधिकाऱ्यानां आम्ही, तिचे कोच, हॉकी महाराष्ट्राचे पदाधिकारी व इतरांनी समजावून सुद्धा काही फरक पडला नाही. शेवटी मी ते प्रकरण सकाळ व इतर मीडिया मध्ये नेलं.
मित्रवर्य सम्राट फडणीस, हर्षदा कोतवाल, प्रियदर्शिनी हिंगे यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. प्रकरण तापल्यावर राज्याच्या क्रीडा आयुक्तांनी याची दखल घेऊन तिचं निलंबन रद्द केलं.
गावातून परतून तीने ग्राऊंडवर जिद्दीने पुन्हा सरावाला सुरवात केली. पुढे जाऊन इंडिया टीमसाठी क्वालिफाय होण्यासाठी ती धडपडत होती. प्रचंड मेहनत घेत होती.
आणि...
आज ऋतुजाच्या तपाला यश आलं. ती International Tournament खेळायला दक्षिण अमेरिकेतील चिलीला जात आहे. इंडियन हॉकी टीमची खेळाडू म्हणून आणि ते ही फॉरवर्ड पोझिशनवरच !
ज्या नॅशनल टीमचा भाग व्हायला देशातील लाखो खेळाडू कित्तेक वर्षे दिवस-रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतात...
तिला जेव्हा निलंबित केलं तेव्हा मला एका गुणी खेळाडूचा दुर्दैवी अकाली अंत होतांना तर दिसतच होतं. पण त्याहून क्लेशदायक म्हणजे एक कोवळ्या वयातील निष्पाप पोर आयुष्यभर कधीच न भरून येणारा डाग आयुष्यभर घेऊन जगली असती. आणि तेच मला नको होतं. म्हणून तिला न्याय देण्यासाठी सर्वस्व पणाला लावायच्या तयारीनेच उतरलो होतो.
तिचं निलंबन रद्द झालं तेंव्हा आनंद झाला होताच पण आज तिचं एवढं मोठं यश पाहून मनापासून सुखावलो. माझा विश्वास खरा ठरला !
वादळातला दीप जपतांनाचा आणि त्यालाच पुढे यशाच्या शिखरावर जातांना पाहण्यातला आनंद फार मोठा असतो !
-कुलभूषण बिरनाळे