सावित्री उत्सव : पित्याच्या रुपाने जोतिबा पाठीशी असताना सावित्रीला भीती कशाची?
X
सावित्रीबाईंना माझ्या वतीने विनम्र अभिवादन. सावित्रीच्या आयुष्यात जोतिबा आले तसे माझ्या आयुष्यात आलेले माझे जोतिबा म्हणजे माझे वडील वामन रावजी देशमुख.
एक प्रसंग सांगते माझे अस्तित्व जपणारा. माझे आत्मभान जागृत करणारा. माझ्या लग्नाच्या वेळी मला पाहायला नवऱ्याकडची मंडळी येणार होती. त्यावेळी मध्यस्थाने सुचविले की मुलीला पाहुण्यांच्या समोर दिवाणखान्यात खाली पाटावर बसवावे. सर्व मंडळी सोफ्यावर बसतील व तिथेच तिची प्रश्नोत्तरे होतील. थोडक्यात मुलाखतीचा प्रकार म्हणा ना !! मध्यस्थ गृहस्थाने हे सारे फोनवर सांगितले असता माझे वडील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, माझी मुलगी खाली पाटावर बसणार नाही. ती खुर्ची वर तुमच्या बरोबरीने बसेल. त्या नाजूक प्रसंगात देखील त्यांनी आपल्या मुलीच्या आत्मसन्मानाचा किती खोलवर विचार केला होता. ही फार मोठी गोष्ट आजही माझ्या लक्षात राहिली आहे. ही घटना साधारण २० वर्षांपूर्वीची आहे. या प्रसंगामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. वैद्यकीय शिक्षण घेतलेली एक सुशिक्षित मुलगी ती एकटीच खाली बसेल व सर्व पाहुणे मंडळी सोफ्यावर बसतील ही कल्पना त्यांना रुचली नाही. आणि त्याला त्यांनी नापसंती दर्शविली.
माझ्या मनात एक प्रकारची कमीपणाची भावना निर्माण झाली असती. माझ्या आत्मसन्मानाला ठेच लागली असती हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही गोष्ट माझ्या कानावर देखील घातली होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आपण स्त्री म्हणून कमी आहोत असे कधीही मला वाटत नाही. कधीही संकटप्रसंगी आजही मला एकटेपणा वाटत नाही. पित्याच्या रुपाने आधुनिक जोतिबा पाठीशी असताना या सावित्रीच्या लेकीला भीती कशाची?
३ जानेवारीला सावित्रीबाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी दारात रांगोळी घालणार आहे. घरात गोडधोड करणार आहे आणि उंबऱ्यावर एक ज्ञानाची एक पणती लावणार आहे. आणि इतरांनाही तसे करण्यास सांगणार आहे.
- डॉ. राधिका माणिक देशमुख, हिंगोली