Home > सावित्री उत्सव > सावित्री उत्सव : कोरोना काळात आम्ही समाजाचा खुप त्रास सहन केला, मग सावित्रीने किती सोसलं असेल

सावित्री उत्सव : कोरोना काळात आम्ही समाजाचा खुप त्रास सहन केला, मग सावित्रीने किती सोसलं असेल

“मी नर्स असल्याने कोरोना काळात लोक मला बघून दुर पळायची, मग त्या काळी सावित्रीबाईंनी किती सोसलं असेल.” वाचा नर्स नीना बने यांचा अनूभव

सावित्री उत्सव :  कोरोना काळात आम्ही समाजाचा खुप त्रास सहन केला, मग सावित्रीने किती सोसलं असेल
X

होय, आम्ही सावित्री च्या लेकी आहोत. तिने 'स्त्री शिक्षणासाठी' त्या वेळी दिलेला लढा, त्यामुळेच आम्ही 'चूल आणि मूल' सांभाळून या विश्वात नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतोय. तिचे आम्ही शतशः ऋणी आहोत. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांबरोबर शिक्षण घेतेय, बरोबरीने काम करतेय. घरोघरी स्त्रीला आपल्या पतीची साथ हवी असते. सावित्रीबाईंना आपल्या पतीची जोतिबांनी दिलेला अनमोल पाठिंबा त्यामुळे त्या इतिहास रचू शकल्या. खर तर प्रत्येक स्त्री नोकरी धंद्यासाठी बाहेर पडते तिला आपल्या पतीचा पाठिंबा हवा असतो. तेव्हा ती यशस्वीपणे काम करु शकते.

असाच काहीसा अनुभव आमच्या नर्सेससाठी करोना या महामारीच्या काळात आला. पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन होते. पण फक्त आम्ही इमर्जन्सी ड्युटीवाले हॉस्पिटल मध्ये काम करत होतो. त्या वेळी हॉस्पिटलचे इन्फेक्शन घरात नको म्हणून बर्या च नर्स मुलींसाठी होस्टेलला राहण्याची व्यवस्था केली होती. लांबून येणाऱ्या मुली त्या हॉस्टेलला रहात पण होत्या.त्यांचे नवरे घर सांभाळत होते आणि घरातील सर्व लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची काळजी घेत होते. या सर्व गोष्टीचं श्रेय मी जोतिबा आणि सावित्री बाईंना देवू इच्छिते. कारण स्त्रियांच्या स्वतंत्रते विषयी त्यांनी केलेली जागरुकता. त्यांच्यामुळेच स्त्रियांना समानतेची मिळालेली वागणूक.

या इथे समाजाकडून आलेला कटू अनुभव नमुद करते ते कुठलाही आकस मनात न ठेवता आणि तक्रार म्हणून तर मुळीच नाही. पण थोडी जागरुकता यावी या उद्देशाने. आमची एक सहकारी नर्स भाड्याने घर घेऊन रहात होती. तिला तिथल्या शेजार्यांलनी घर सोडून जाण्या इतपत त्रास दिला. मी जिथे रहाते तिथे माझ्याशी काही शेजारीपाजारी तर बोलायचंही टाळत असत, केवळ मी नर्स होते म्हणुन. मला लिफ्ट मध्ये बघून काहीजण चालत घरी जात असत. कधी कोणी बोललेच तर दुरुन आणि मोजकेच बोलत. अशावेळी थोडे वाईट वाटत असे. परंतु मी ही त्याकडे दुर्लक्ष करीत असे कारण आपल्यामुळे कोणाला संसर्ग नको व्हायला. करोनाच्या या महामारीत ज्या ज्या योद्ध्यांनी जे मोलाचं योगदान दिले आहे त्यांच्या प्रती सहकार्याची भावना असावी हा हे सांगण्यामागील एकमेव उद्देश.

सावित्रीबाईंनी त्यावेळी असं बरच काही सोसले आहे आणि आम्हां स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. सावित्रीबाईंनी जेवढं भोगले आहे त्याच्या निम्याने कोरोना काळात आम्हाला आलेले अनुभव आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे. म्हणून येत्या 3 जानेवारी रोजी सावित्री उत्सवाच्या निमित्ताने मी दारात रांगोळी काढून, तोरण लावून, घरात गोडधोड करून सणासारखा दिवस साजरा करणार आहे. कारण ज्या घरात एक स्त्री शिक्षण घेते ते पुर्ण घर सुशिक्षित होते, पुर्ण देश प्रगतीपथावर जातो याचे श्रेय आपण सावित्रीबाईंनाच द्यायला हवे, नाही का?

- नीना बने, नर्स मुंबई

Updated : 29 Dec 2020 12:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top