Home > रिलेशनशिप > सहजीवनातील जोडीदार जोतिबा

सहजीवनातील जोडीदार जोतिबा

‘सहजीवनाचा’ टिपिकल अर्थ बदलणारे महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती... समतेच्या आधारावर सावित्री आणि जोतिबा यांचे सहजीवन नेमके कसे होते? सावित्रीज्योतीच्या सहजीवनाची प्रेरणादायी कहानी जाणून घ्या महेंद्र नाईक यांच्या लेखनीतून...

सहजीवनातील जोडीदार जोतिबा
X

'सहजीवन म्हणजे एकत्र जगणं' इतक साधं सांगता येईल. पण रिलेशनचा विचार करताना सहजीवनाचा अर्थ अधिक व्यापक करायला हवा. माझ्या मते, 'दोघांनी (किंवा एकापेक्षा जास्त कितीही) एकत्र जगताना प्रत्येकाचं जीवन खुलवत जाणं म्हणजे सहजीवन'. अशी सहजीवनं तुलनेने कमी असली तरी समाजात असतात. मात्र ती इतरांना माहित असतीलच असं नाही. ज्यांच्याकडे समाज आदर्श म्हणून बघतो, त्यांच्यामध्येही अशी सहजीवने अपवादानेच दिसतात. या उलट शोषित (सह)जीवनांचं मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण केलेलं दिसतं. नुकतेच एका प्रसिद्धी झोतात राहू पाहणाऱ्या अभिनेत्रीने 'गांधीजी चांगले पती नव्हते' असं म्हटलं. तिची निरर्थक बडबड माहित असल्याने टीका झाली. पण तिचं म्हणणं अगदीच चूक नव्हतं. या देशातल्या तळा-गाळातल्या स्त्रियांना जन आंदोलनात उतरण्याचं आत्मबल देणारा महानायक 'चांगला' म्हणावा असा पती नव्हता, हे मान्य करावं लागेल. समतेच्या पातळीवर या अनेक महापुरुषांच्या मर्यादा राहिलेल्या आहेत. अशा वेळी प्रकर्षाने डोळ्यासमोर येतात ते 'जोति-सावित्री'.

मानवी शोषणाच्या, गुलामीच्या सर्वांगाची जाण समाजाला आणि व्यवस्थेला करून देणाऱ्या जोतिबांच नाव सावित्री शिवाय पूर्ण होत नाही, असं जरी असलं तरी दोघांच्याही सावल्या एकमेकांना झाकत नाहीत तर परस्परांना शिखरासारख्या उंच घेऊन जातात. हे अभूतपूर्व आहे. खरचं ही अतिशयोक्ती नाही. जोतिबांच्या समकालीन सुधारक असतील, काही त्यांच्या आधीचे तर अनेक त्यांच्या नंतरचे घेतले तरी जोडीने नावं घेतली जातात असं फारसं आढळत नाही आणि ती नावं केवळ जोडी म्हणून नाही तर सहजीवनाची प्रेरणा, मापदंड ठरावा अशी तर नाहीतच. म्हणजे 'समिधा' वाचेपर्यंत साधनाताईंच आनंदवन उभारण्यातील प्रचंड योगदान माहीतच नसतं. 'आहे मनोहर तरी' वाचल्याशिवाय सुनीताबाई समजलेल्या नसतात. पण जोति शिवायही सावित्री जनमानसात घर करते आणि जोति म्हटलं की सावित्री आपोआप तोंडात येते. याचं मोठ श्रेय मी, पितृसत्ताकतेबाहेर 'माणूस' म्हणून जगणाऱ्या जोतिबांना देईन.

जोतिबांचा विचार करतांना, आजचा विचार करून पावणेदोनशे वर्षे पुन्हा मागे जातो तेव्हा जोतिबा अधिक प्रखरतेने जाणवतात. काय आहे आजची परिस्थिती? पितृसत्ताक व्यवस्था आणि तिचे अपत्य असणारी पुरुषप्रधानता व मर्दानगीच्या कल्पनांत 'पुरुष' पुरता अडकून पडलाय. एकीकडे स्वतःचं शोषण आणि दुसरीकडे स्त्रीवरची हिंसा आणि दुय्यमत्व, अशा दुहेरी अवस्थेतून तो जातोय. तरीही या शिक्षित आणि आधुनिक 'पुरुषाला' या संकल्पनांतून बाहेर पडता येत नाही. जोतिबांनी स्वतःवरची ही बंधने ठामपणे झिडकारली. पितृसत्ताकतेतून येणारे सर्व अधिकार, सत्ता आणि सवलती सोडून दिल्या. म्हणूनच स्त्रीच्या दास्यमुक्तीचा विचार करताना आणि त्यासाठी शिक्षणासारखा मार्ग निवडताना त्यांनी सावित्रीचा पहिला विचार केला. शिकलेली सावित्री पुढे जोतिबांची पण प्रेरणा बनली. पुरुष जेव्हा पितृसत्ताकतेची स्वतःवरची बंधने झुगारतो, तेव्हा त्याला त्याच्या बरोबरच्या स्त्रीवरची बंधने वेगळी दूर करावी लागत नाहीत, ती आपोआप संपुष्टात येतात. जोतिबा त्या बंधनांपासून मुक्त होते. त्यामुळे सावित्रीवर पितृसत्ताकतेची बंधने येण्याचा आणि ती दूर करण्याचा प्रश्नच नव्हता. सावित्रीने व्यवस्थेविरुद्ध प्रचंड संघर्ष केला, पण त्या संघर्षात उतरण्यासाठी इतर स्त्रियांना जसा स्वतःच्या सहजीवनात आधी संघर्ष करावा लागतो तो तिला करावा लागला नाही. कारण…..जोतिबा.

जोतिबांनी सावित्रीला शिकवण्यामागे त्यांना हवी असलेली 'स्त्री शिक्षिका' एवढा मर्यादित हेतू नक्कीच नव्हता. ते सावित्रीकडे 'एक स्वतंत्र व्यक्ती' आणि 'समान दर्जाची व्यक्ती' म्हणून पाहतात. सावित्रीचे शिक्षण ही त्यांची कृतीशील विचारांची ती पायाभरणी होती. सावित्रीला त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनाची दिलेली ती जाणीव होती. ती जाणीव मिळाल्यावर सावित्रीला पुढे कुणीच रोखू शकलं नाही, अगदी पुण्यातील सनातनीही तिच्यापुढे निष्प्रभ ठरले. जोडीदार म्हणून कायम हातात हात घेऊनच चालावं लागत नाही, हातातील स्पर्शात 'समतेची जाणीव' असेल तर पुढला प्रवास सुकर होतो. त्यांना जेव्हा मुल होण्यासाठी दुसरं लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आणि जोतिबांनी त्यावर, सावित्रीच्या (स्त्रीच्या) अंगाने विचार करणारी, तिच्या भावनांनाही गृहीत धरणारी भूमिका घेतली, तेव्हाही जोतिबांतील 'समताधिष्ठीत माणूस' दिसून आला. बाळाची वाट पाहणाऱ्या असंख्य स्त्रिया स्वतःच्या शरीराची प्रयोगशाळा करूनही स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात पाहत असतात. त्या प्रत्येकीच्या आयुष्यात 'जोतिबा' आला तर किती मोठ्या दुःखाचा अंत होईल ना! किंबहुना ते दुःख त्यांच्या आयुष्यात जन्मालाच येणार नाही.

'माझ्यात दोष असेल तर सावित्रीला दुसरं लग्न करू द्या' हे एक वाक्य पितृसत्ताकतेला मुळातून उखडून टाकतेच पण विवाह संस्थेच्या उद्देशालाही खोडून टाकते आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करते. …..बापरे ! एकनिष्ठतेच्या अपेक्षा ठेवणाऱ्या आजच्या स्मार्ट(फोन) जगातल्या तरुणांना तरी हे वाक्य पचनी पडेल का? जोविनीच्या माध्यमातून तरुणाईचे परंपरावादी विचार समजून घ्यायला मिळतात तेव्हा पावणेदोनशे वर्षापूर्वीच्या जोतिबांच्या प्रत्येक कृतीचा संघर्ष डोळ्यांसमोर येतो. स्वतःच्या सहजीवनात असे ठाम भूमिका घेणारे जोतिबा रिलेशनकडेही किती निकोप पाहतात! 'भ्रूण हत्या प्रतिबंधक गृह' हे अशाच कृतीशील विचारांचं प्रतिक आहे. जोतिबा स्त्री- पुरुषांतील रिलेशनचा किती नैसर्गिक अर्थ लावत होते ते त्यातून दिसते. रिलेशनला नैतिक- अनैतिकतेच्या चौकटीत अडकवून स्त्रीचा सर्व बाजूंनी कोंडमारा करायचा, हे आजही तेव्हढयाच ताकदीने चालू आहे. तिच्या भावना, मानसिक गरजा यांचा विचार केला जात नाहीच पण लैंगिकतेचे दमनही मोठ्या प्रमाणावर होत असते. जोतिबांनी लैंगिक गरजेकडेही तेवढ्याच नैसर्गिकपणे पाहिले. कथित अनैतिक संबंधांची देहांत (आत्महत्या) ही शिक्षा त्यांनी नाकारली. त्याचा संबंध स्त्रीच्या 'जगण्याच्या मुलभूत अधिकाराशी' आहे, हा विचारही त्यावेळी केला जात नव्हता, तो जोतिबांनी केला. जोतिबा, त्या स्त्रीच्या लैंगिक संबंधातून किंवा तिच्यावर लादलेल्या संबंधातून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा अधिकारही मान्य करीत होते. स्त्रीची लैगिक गरज, तिचं मातृत्व या कशालाही रिलेशनच्या लेबलशिवाय स्विकारणारे जोतिबा मध्ययुगापासूनचे कदाचित पाहिले पुरुष असावेत. त्यांनी स्त्रीच्या दुःखाचा, शोषणाचा विचार करतांना तिच्या गरजांचाही विचार केला. इथे त्यांनी सहजीवनाचा टिपिकल अर्थच बदलला.

पुराणात, आपल्या वचनपूर्तीसाठी राज्य सोडून प्रभू श्रीराम पत्नीसह वनवासाला जातात. जुगार हरणारे पांडवही आपल्या पत्नीसह वनवासाला जातात आणि वास्तव जगात जोतिबा, समतेच्या कामात अडसर नको म्हणून सावित्रीच्या सहमतीने घराबाहेर पडतात. पुढे प्रभू श्रीराम 'मर्यादा पुरुषोत्तम' आणि आजच्या देशाची अस्मिता बनतात. पांडव 'धर्मराज, योद्धा, धनुर्धर' इत्यादी बनतात. पण सीता आणि द्रौपदी बाईपणाचे चटके सहन करून घायाळ होतात, त्या स्त्री शोषणाचे मापदंड ठरतात. मात्र व्यवस्था बदलाचा वसा घेवून स्वतःहून घराबाहेर पडलेले जोतिबा 'महात्मा' म्हणून गौरवले जातात आणि सावित्री आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून 'क्रांतीज्योती' बनते. ती स्त्रीच्या मुक्तीचा, तिच्या 'स्व'चा मापदंड ठरते. कारण ती जोतिबांच्या छायेत वावरत नसते, ती त्यांच्या बरोबरीने चालतही नसते तर ते दोघेही एकमेकांना बरोबर घेऊन पुढे जात असतात. घराबाहेर पडताना जोतिबांनी पती अधिकारातून सावित्रीला बरोबर घेतलेलं नसतं की सावित्री पतिव्रता म्हणून त्यांच्या बरोबर आलेली नसते. दोघेही समतेच व्रत घेऊन सहमतीने बाहेर पडलेले असतात. सीता, द्रौपदीची परवड इथल्या स्त्रीला भूषणावह वाटते; परंतु, आजही अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत, ज्यांना पहिला स्वतःच्या कुटुंबात, जोडीदाराबरोबर संघर्ष करावा लागला आहे. सावित्रीला मात्र ते करावं लागल नाही. कारण …. जोतिबा.

सावित्रीने जोतिबांना जेव्हा अग्नी दिला तेव्हा पितृसत्ताकतेची तिने पुरती राख करून टाकली. सावित्रीची ही क्रांती जोतिबांनंतरची होती. जोतिबांनंतरही तिची क्रांती अखंड चालूच होती. हे सामान्य नाही. उत्तुंग कर्तृत्वाच्या व्यक्तिबरोबरच्या जोडीदारानेही त्याच उंचीवर पोहचण्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. समतेच्या कामातील अनेक पुरुष कार्यकर्त्यांच्या जोडीदार त्यांच्याबरोबर असतातच असं नाही. हा व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येत नाही. समतेचा विचार हा मानवी जगण्यातील मूलभूत विचार असायला हवा. तो सक्तीने लादायचा नक्कीच नाही, मात्र तो झिरपायला हवा. पुढल्या पिढीपर्यत जसा झिरपायला हवा तसाच जोडीदारामध्ये पण. त्यासाठीचा संवाद आणि स्पेस या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. जोति- सावित्रीमधील स्पेस आणि साहकार्य दोन्ही अफलातून होतं.

सावित्रीचं कर्तृत्व हे सावित्रीचचं होतं. त्याच श्रेय जोतिबांना नाही तर त्यांच्यातील पुरकतेला आहे. आणि सहजीवनातील पूरकता समतेच्या वाटेशिवाय बहरत नाही. या वाटेवर पुरुषांचा रोल महत्वाचा ठरतो. कारण इथल्या व्यवस्थेने त्याला अधिकार, सत्ता, वर्चस्ववादी भावना सर्व जन्मापासूनच दिलेल असतं. ते चूक आहे, हे समजून घ्यायलाही ही व्यवस्था त्याला उसंत घेऊ देत नसते. जोति-सावित्रीच्या सहजीवनाचा विचार केला तर त्याचं वय तसं लहानच होतं. माध्यमेही उपलब्ध नव्हती. इतक्या कमी वयात जोतिबा या व्यवस्थेविरुद्ध भूमिका घेऊ शकले. ते त्यांच्यातला 'पुरुष' पुसून 'माणूस' म्हणून सावित्रीला आपली ओळख पटवू शकले. ही ओळख प्रत्येक टप्प्यावर कृतीशील होती आणि सावित्रीच्या सहभागासह होती. त्यामुळे सावित्रीला तिच्या जगण्याची चाकोरीबाहेरची दिशा ठरवणं शक्य झालं. 'मला चारचौघीसारखं जगायचं नाही' हे तिला स्पष्ट झालं. जोतिबा टिपिकल 'नवरा' असते तर सावित्रीला तिची ओळख शोधणं कदाचित शक्यच झालं नसतं. म्हणूनच हे लक्षात घ्यायला हवं की, सावित्री समाजात असतातच पण जोतिबांसारख वादळ त्यांच्या आयुष्यात नसल्याने अनेकजणी व्यवस्थेच्या धुळीखाली तशाच दबलेल्या राहतात. म्हणजे सावित्री वेगळी निर्माण करावी लागत नाही, तर तिच्याभोवती कुंपण निर्माण न करणारे जोतिबा असावे लागतात. व्यवस्थेची धूळ झटकण्याची त्यांची मानसिकता असावी लागते. म्हणूनच सहजीवनाचा विचार करतांना जोतिबांना समोर ठेवावं लागतं. त्यांच्यातील जोडीदार समजून घ्यावा लागतो. 'समतेच्या वाटेने सहजीवनाचा प्रवास' हे माझ वाक्य, जोतिबा- सावित्रीला आठवतो तेव्हा परफेक्ट असल्याच जाणवतं. आपण हेही लक्षात घ्यायला हवं की, जोतिबा असं सहजीवन जगले नसते तर कदाचित तेही महात्मा बनू शकले नसते. म्हणजेच आपल्याला आपली उंची गाठण्यासाठी आणि सावित्रीभोवती आपल्याकडून कुंपण पडू नये, या दोन्हीसाठी जोतिबांना सहजीवनातील जोडीदार म्हणून समजून घ्यायला हवं.

महेंद्र नाईक

Updated : 11 April 2021 12:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top