अमृता फडणवीस यांचे नवे गाणे, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावरुन त्यांना ट्रोल केले गेले आहे. पण अमृता फडणवीस सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल का होत आहेत. याचा आढावा घेणार हा रिपोर्ट पाहा...
X
अमृता देवेंद्र फडणवीस, नाम तो सुना ही होगा.....हो त्याच अमृता फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातत्याने मीडियामध्ये झळकत राहिल्या....आता देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन विरोधी पक्षनेतेपद आले आहे...पण तरीही अमृता वहिनी मीडियाऐवजी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत....अर्थात आपल्या देशात लोकशाही आहे....त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्यापासून त्यांना कुणी रोखू शकत नाही. पण मग त्या सोशल मीडियावर व्यक्त झाल्या की लगेच त्यांना ट्रोल का केले जाते, हा प्रश्न निर्माण होतो आहे.
आता अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त महिला सक्षमीकरणासंदर्भात त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी आपली नापसंती दर्शवणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत. यामध्ये विनय काटे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून "वंदनीय मामी, ती नक्की जगेल, फक्त तुमचं गाणं बंद करा, आवाजाला घाबरून गर्भपात व्हायचा एखादीचा! " असा टोला लगावत फेसबुक पोस्ट टाकली आहे.
तर दुसरीकडे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी "हिला नको गाऊ द्या" अशी पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
तर सुषमा अंधारे यांनीही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांना चिमटे काढले आहेत. त्या म्हणतात, "एवढे सगळे सामाजिक संदेश देत राहिले... वाटलं, कदरदान लोक भारतात राहतात आणि तुम्ही मात्र माझ्या कलेची थट्टा उडवली निंदा नालस्ती केली..."
पण अमृता फडणवीस यांना सातत्याने का ट्रोल केले जाते हा प्रश्न उपस्थित होतो आहे. यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितले की, "कोणत्याही महिला सेलिब्रिटीने सोशल मीडियावर काही पोस्ट केले तर त्यावर नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येतात. अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर काही आक्षेपार्ह भाषेत आलेल्या प्रतिक्रियांचा निषेधच केला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर अमृता फडणवीस ज्या पद्धतीने सोशल मीडियावर राजकीय टीका टिप्पणी करत आहेत, त्यानंतर त्यांना ट्रोल केले जाईल हे त्यांनी गृहीत धरले पाहिजे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला टार्गेट केले आहे ते पाहता शिवसैनिक त्यांना टार्गेट करु शकतात. पण अमृता फडणवीसांनी अचानक राजकीय टीका करण्यामागे हेतू काय याचाही विचार झाला पाहिजे"
तर स्तंभ लेखिका मुग्धा कर्णिक यांच्यामते "अमृता फडणवीस यांच्या पोस्टकडे आपण लक्ष देत नाही. पण एकट्या अमृता फडणवीस ट्रोल होतात असे नाही तर कितीतरी लोकांना ट्रोल केले जाते. यामध्ये महिला किंवा पुरूष असा विचार न करता येणार एखाद्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला ट्रोल केले जाणार हे निश्चित आहे." असे म्हटले आहे.