Home > Political > कोणत्या महिला उमेदवाराने निवडणुकीतून घेतली माघार? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम?

कोणत्या महिला उमेदवाराने निवडणुकीतून घेतली माघार? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम?

कोणत्या महिला उमेदवाराने निवडणुकीतून घेतली माघार? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम?
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत. विशेष म्हणजे बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनीच अर्ज मागे घेतल्याने राजकीय पेच निर्माण झालेला पाहायला मिळाले. स्वतःच्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत दंड थोपटले. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून बंडखोरांची नाराजी काढण्यासाठी आणि त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. 4 नोव्हेंबर अखेरीस अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. यासह राज्यात नेमक्या कोणत्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत? कोणते बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत? कोणत्या मतदारसंघात युती-आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनीच अर्ज मागे घेतला? हे सर्व जाणून घेऊयात

निवडणुकीतील महत्त्वाच्या बंडखोर महिला कोण?

भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली. याचा नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार हिना गावित यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांच्या विरोधात अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावित अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. महायुतीकडून शिवसेना आमदार आमशा पाडवी रिंगणात असून उमेदवारी न मिळाल्याने हिना गावित यांनी बंडखोरी केली आहे. नंदुरबारची जागा महायुतीत भारतीय जनता पार्टीला सुटली. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी डॉ. विजयकुमार गावित यांना देण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघात मी उमेदवारी 4 महिन्यांपूर्वी करत असताना मी महायुतीची उमेदवार होते आणि माझ्याविरोधात शिवसेनेचं नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी विरोधात काम केलं. या गोष्टी मी पक्षाच्या वरिष्ठांना लोकसभा निवडणुकीतसुद्धा सांगितल्या. स्वत: शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचाच प्रचार केला. अशी प्रतिक्रिया माजी खासदार हिना गावित यांनी त्यावेळी दिली. तर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून कमल व्यवहारे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बंडखोर महिला कोण?

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसच्या कमल व्यवहारे, पुण्यातील जुन्नर मतदारसंघातून भाजपच्या आशा बुचके यांनी बंडखोरी केली आहे.

महायुती-आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवारांनी कुठे माघार घेतली?

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे यामध्ये केवळ अपक्ष बंडखोर नेत्यांचाच समावेश नाही, तर महायुती आणि महाविकासआघाडीच्या अधिकृत उमेदवारांचाही समावेश आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदासंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदार संघात आता महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही. प्रतिभा पाचपुते यांनी विक्रम पाचपुते या आपल्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आणि स्वतः भाजपची उमेदवारी नाकारली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे. कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहूमहाराज छत्रपती यांनी माध्यमांना याबाबत सांगितलं की, नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागतेय. शाहू महाराज पुढे म्हणाले, "राजेश लाटकर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी माघार घेतली नाही, म्हणून मधुरिमाराजेंनी माघार घेतली. कारण अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, असं आम्ही ठरवलं."

माघार घेतलेल्या महत्त्वाच्या बंडखोर महिला कोण आहेत?

नागपूर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या संगीता तलमले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष हितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे संगीता तलमले यांनी सांगितले. तर नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली. तनुजा घोलप या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या आहेत. तनुजा घोलप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे घोलप कुटुंबात कौटुंबिक कलह सुरू झाला होता. निवडणूक लढवणार असल्यास माझ्या नावाचा वापर करू नये, अशा स्वरुपाची जाहीर नोटीस बबनराव घोलप यांनी काढली. ही नोटीस आल्यानंतर तनुजा घोलप यांनी माघारीचा निर्णय घेतला. देवळालीत शिवसेनेच्या तिकिटावर बबनराव घोलप तर ठाकरे सेनेकडून घोलपपुत्र योगेश घोलप हे दोघे निवडणूक रिंगणात आहेत. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यात उघड नाराजी पाहायला मिळाली. आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून नाराज होऊन बाहेर पडले, यामुळं कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे नाशिक मध्य मतदारसंघातून हेमलता पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांच्यासमोरील बंडखोरीचं संकट टळलं आहे.

माघार न घेतलेल्या महत्त्वाच्या बंडखोर महिला कोण आहेत?

भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. त्यांनी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्या गायत्री शिंगणे यांची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे येथे राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे या काका-पुतणीत लढत होईल हे स्पष्ट आहे. येथे शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड मतदारसंघातून ज्योती मेटे, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून शोभा बनशेट्टी या महिलांनी माघार न घेण्यावर ठाम आहेत. तर सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांचे नेते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत प्रामुख्याने होत असली तरी इतर राजकीय पक्षांनी तसेच काही अपक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने अनेक मतदारसंघातील निवडणुक रंगतदार झाली आहे.

Updated : 7 Nov 2024 8:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top