Home > Political > पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार?

पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार?

पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार?
X

संकटांनो मी तुम्हाला शरण यावे एवढी तुमची औकात नाही, असे वक्तव्य कऱणाऱ्या पंकजा मुंडे यांना पक्षाने विधान परिषद निवडणुकीत डावलले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची पुढची दिशा काय असेल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्याचे संकेत दिले होते.

विधान परिषदेची उमेदवारी पक्षाने नाकारली आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काही दिवस संयम बाळगला खरा पण आता त्यांचा संय़म सुटला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तर आज संतप्त कार्यकर्त्यांनी चक्क प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं व पुढे होणाऱ्या गोष्टी टळल्या. आता पंकजा मुंडे नाराज नसल्याचं अनेक भाजपचे नेते म्हणत असले तरी पंकजा मुंडे यांनी मात्र याबाबात मौन बाळगलेले आहे. या सगळ्यावर पंकजा मुंडे यानी काहीही न बोलल्यामुळे त्या नाराज असल्याची राज्यात चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात आपल्या भविष्याची काळजी करु नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते, त्याचवेळी पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी इशाराही दिला होता. त्यामुळे सध्या जरी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याबद्दल कोणतीही भूमिका व्यक्त केली नसली तरी त्या काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय़ केंद्रीय नेतृत्वाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच पंकजा मुंडे सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत, मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबबादारी देण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाच्या मनात असेल असेही पाटील म्हटले आहे. तर दुसरीकडे मुंडे घराण्याचे राजकापण संपवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी ज्यांनी पक्ष बांधणीसाठी आयुष्य वेचले त्यांना देवेंद्र फडणवीस हे बाजूला करत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन असे म्हटले होते, पण त्यांना डावलण्यात आले, याचा समाजावर परिणाम होतो, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडेंचा शिवसेना प्रवेशाबाबत अर्जुन खोतकर काय म्हणाले होते..?

पंकजा मुंडे पुढे काय करणार अशी चर्चा असताना त्यांना शिवसेनेची दारं खुली आहेत, असे संकेत अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत. पंकजा मुंडे आपल्याला बहिणीसारख्या आहेत, त्यांच्याशी जेव्हा भेट होईल तेव्हा शिवसेनेत येणार का हा विषय नक्की काढू, असे त्यांनी म्हटले आहे. विधान परिषदेची उमेदवारी डावलल्याने त्यांचे समर्थक संतप्त आहेत, पंकजा मुंडेंनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना अशीही चर्चा सुरू झाली आहे.

आता जर आपण पाहिलं तर समाजमाध्यमांवर पंकजा मुंडे समर्थक अत्यंत संतप्त झाले आहेत. सोशलमीडियावर कमेंट करून ते पंकजा मुंडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत देखील बोलत आहेत. पण आता भाजप पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करणार का? किंवा पंकजा मुंडे या भाजपला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Updated : 12 Jun 2022 4:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top