Home > Political > मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर काल काय घडलं?

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर काल काय घडलं?

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर काल काय घडलं?
X

देशभरात राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडत असताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांची शिंदे गटातील सर्व आमदारांसोबत मुंबईत बैठक झाली. या बैठकीला बारा बंडखोर खासदार देखील दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. इतकंच नाही तर मुंबईत झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे गटाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी तयार केल्याचं सुद्धा म्हंटल जात आहे. याबाबत कुठलीही अधिकृत माहिती शिंदे गटाकडून देण्यात आलेली नाही मात्र आता आमदारांपाठोपाठ 12 खासदार बंडाच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत गेल्यानंतर या बारा बंडखोर खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असल्याचे सुद्धा समोर येत आहे. काल रात्री नक्की दिल्लीत काय घडलं?

काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. साधारण ११ वाजता ते दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांनी विमानतळाशेजारी असलेल्या एका हॉटेलला भेट दिली. या हॉटेलमध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १२ फुटीर खासदारांचा गट थांबला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या खासदारांसोबत जेवन केलं. आणि नंतर या ठिकाणाहून ते बाहेर पडले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बैठक होती . त्यासाठी वकीलांसोबत बैठक घेतली. मात्र, ही बैठक ओबीसी आरक्षणासाठी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असले तरीही हॉटेल बाहेर अनेक खासदारांच्या गाड्या होत्या. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनाकडे रवाना झाले.

शिंदे गटात नक्की काय सुरु आहे?

या नव्या कार्यकारिणीत शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कथित कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाला मात्र स्पर्श देखील केलेला नाही. ही काही पहिली वेळ नाही. एकनाथ शिंदे यांनी या आधी सुद्धा प्रतोद आणि गटनेते पदावर अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्या अपरोक्ष सवतःला गटनेते आणि भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. हे सर्व प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आणि 20 जुलै ला त्यावर निकाल येणं अपेक्षित आहे.

या नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करत नेते म्हणून आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांची नेमणूक केली आहे. या दोघांचीही काल शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई या कारणास्तव हकालपट्टी करण्यात आली होती. तर शिवसेनेच्या उपनेतेपदी शिंदे गटाने गुलाबराव पाटील, उदय सामंत, यशवंत जाधव, शरद पोंक्षे, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील, तानाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील बैठकीला कोण खासदार उपस्थित होते?

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार काल मुंबईतील एका हॉटेल मध्ये झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीला 12 खासदारांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. या बैठकीला सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलीक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने, भावना गवळी हे खासदार उपस्थित होते. तर आजच्या बैठकीला विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे, कलाबेन डेलकर हे खासदार अनुपस्थित राहिले.

मूळ पक्षावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदेंची नवी खेळी

मूळ शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणखी आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. मूळ पक्षावर दावा करण्यासाठी शिंदे गटाला राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा लागेल. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून अनेक युवासेनेचे कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

कार्यकारिणी जाहीर मात्र अधिकृत वक्तव्य नाही

एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मात्र कार्यकारिणीवर आणि खासदारांच्या उपस्थितीवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी आमच्या अशा बैठका होत असतात असं म्हणत या बातमीला बगल दिली.


मुख्यमंत्री दिल्लीला रवाना..

ही बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 20 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जातेय. शिवाय ते सॉलिसिटर तुषार मेहता यांची देखील भेट घेणार आहेत. यावेळी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचतात रात्री त्यांची एका हॉटेलमध्ये या सर्व 12 बंडखोर खासदारांसोबत बैठक झाली असल्याचे सुद्धा माहिती समोर येत आहे.

Updated : 19 July 2022 11:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top