"क्लीन स्विपचा दावा करणाऱ्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये उमेदवार मिळेनात"
तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा भाजपवर निशाणा
X
पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने रविवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपने खासदारांना, चित्रपटातील कलाकारांना, केंद्रात मंत्री असलेल्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यावरुन तृणमूल कॉंग्रेसच्या फायरब्रांड खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
क्लीन स्विपचा दावा करणाऱ्या भाजपला उमेदवार मिळत नाही. जे मिळाले आहेत ते ही मोठ्या प्रयत्नाने मिळाले आहेत. असं महुआ मोइत्रा यांनी ट्विट केलं आहे. तृणमूलचा हा आरोप भाजपला चांगलाच जिव्हारी लागला आहे.
पश्चिम बंगालच्या भाजप उमेदवारांच्या संथ गतीने होणाऱ्या घोषणांची मालिका पाहून मजा येतं आहे. जेव्हा जगातील सगळ्यात मोठ्या पार्टीकडे एकसाथ 294 उमेदवारांची घोषणा करण्यासाठी उमेदवार नाही. ताकद नाही. तेव्हा हा दावा किती खरा वाटतो की, हे क्लीन स्विप करतील....
कोणाला दिली उमेदवारी?
भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार लॉकेट चॅटर्जी, स्वप्नदास गुप्ता आणि नीतीश प्रमाणिक यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपने तिसऱ्या यादीत 27 उमेदवारांची आणि चौथ्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. मागच्या आठवड्यात भाजपने आपली पहिली 57 उमेदवारांची घोषणा केली आहे.
भाजपने तृणमुल कॉंग्रेसचा हा दावा फेटाळून लावला असून आमच्याकडे स्थानिक उमेदवार आहेत. तसंच पश्चिम बंगालची जनता हीच या निवडणुकीत उमेदवार आहेत. असं तृणमूल कॉंग्रेसला उत्तर दिलं आहे.