सरकार स्थापनेच्या एक वर्षानंतर सोनिया गांधी इन ॲक्टीव्ह मोड
X
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारने एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुस्तिका प्रकाशित करुन वर्षभरात केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध केली आहे. पण आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले असले तरी राहुल गांधी महाराष्ट्रात फिरकले नाहीत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस राज्याच्या निर्णय प्रक्रियेत नसल्याचे वक्तव्य केले होते. पण त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रात लक्ष घातले नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नसल्याचे सांगत टीका केली होती. त्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली होती. पण त्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व जागं झाल्याचं दिसत आहे.
सोनिया गांधींच्या पत्रात काय?
अनुसूचित जाती आणि जमातीमधील उद्योजकांना वाव देण्यासाठी सरकारी कंत्राट देताना त्यात राखीव कोटा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रम बाबत सोनिया गांधींनी ही सूचना केलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्गासाठी योजना राबावाव्या, अशी सूचना करणारे पत्र काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. महाविकास आघाडीतील एक पक्ष म्हणून, काँग्रेस समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्यातील एसटी एनटी लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद करावी असे त्यांना म्हटले आहे.