प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरवर दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार
X
सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकीय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.
काँग्रेस भवन समोरील बाजूस माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अज्ञात समाजकंटकांनी काँग्रेस भवन समोरील भागात असलेल्या फ्लेक्स किंवा डिजिटल बोर्डावर शाई फेकून निघून गेले. याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी बादली भर पाणी आणून सर्व डिजिटल बोर्ड पुसण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी काँग्रेस भवन येथे येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना 'निंदकाचे घर असावे शेजारी' असा टोमणा देखील मारला.
चार दिवसांपूर्वी सोलापुरातील काँग्रेस भवन येथे बैठक सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यावर नाराजी व्यक्त करत वाद केला होता. वाद मोठ्या प्रमाणात होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पण काँग्रेसच्या इतर पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला होता. यावर माहिती देण्यास काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी टाळाटाळ केली. त्यांनी विरोधकांवर आरोप करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस भवन हे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे हे घटनास्थळी आले आणि पंचनामा करून अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून हल्लेखोरांना पकडून कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.