Home > Political > शिंदे गट फुटणार...?

शिंदे गट फुटणार...?

शिंदे गटातील आमदार व भाजप यांच्यामध्ये मतभेद होत असल्याचं समोर येत आहे. याला कारण आहे किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका. किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना माफिया म्हणाले आणि मग शिंदे गटातील आमदारांनी थेट आम्हाला सत्तेची हाव नाही असं म्हणत इशारा दिला. ठाकरेंबद्दल केलेल्या या क्तव्यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले आहेत. सत्ता स्थापन होऊन काही दिवस होतात न होतात तोपर्यंत पुन्हा शिंदे गटातील आमदारांचे भाजप सोबत आता खटके उडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता शिंदे गट फुटणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे..

शिंदे गट फुटणार...?
X

आपण पाहतो आहोत की मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घटना घडल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली आणि शिवसेनेचे एक-दोन नाही तर चाळीसहून अधिक आमदार आपल्या सोबत घेऊन जात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा देखील देण्यात आली. हे सगळं होत असताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं हे पाहता महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणावर भावुक झाल्याच आपल्याला पहायला मिळालंच पण इतकाच नाही तर शिंदे गटासोबत असलेल्या आमदारांना सुद्धा हि गोष्ट मनाला लागलेली पाहायला मिळाली. त्यांच्या राजीनाम्या नंतर एकाही आमदाराने आनंदत्सव साजरा केला नाही. आज हे आमदार शिंदे गटासोबत गेले असले तरी त्यांनी आपला नेता म्हणून उद्धव ठाकरेंना नाकारलेले दिसत नाही. या बंडानंतर उद्धव ठाकरेंबद्दल शिंदे गटातील कोणीही एक वाईट शब्द सुद्धा काढला नाही.

मागच्या काही काळात जो प्रकार घडला त्यामुळे शिंदे गटात लवकरच फूट पडेल व हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी चर्चा सुरु आहे. यात कालच घडलेल्या प्रकारामुळे शिंदे गटातील मतभेद आता समोर आले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोलताना उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत टीका केली होती. त्यावर बुलडाण्याचे शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना संपली असे समजू नये, आम्ही सत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचेवर आमची श्रद्धा नाही असा समज सोमय्या यांनी करून घेऊ नये, तसेच यापुढे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेचीही पर्वा नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्या यांना दिला आहे. एकीकडे शिंदे गटातील आमदारांमध्येच मतभेद असल्याची चर्चा चिमणराव पाटील आणि गुलाबराव पटील यांच्यातील वादामुळे निर्माण झाली आहे. त्यातच आता आमदार संजय गायकवाड यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेबद्दलही शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे आता समाजमाध्यमांसह राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे कि शिंदे गटातील अनेकांमध्ये नाराजी आहे व लवकरच शिंदे गट फुटणार. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन काही नाट्यमय गोष्टी घडतात पहाव्या लागणार आहेत.

Updated : 9 July 2022 9:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top