"आणि संदिपच्या बायकोने पोलिसांना फ्रीज उघडून दाखवला," राज ठाकरेंचं संदिप देशपांडेंच्या प्रकरणावर वक्तव्य
X
गेल्या दोन महिन्यांच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही चौथी सभा आहे. विविध विषयांवर विविध टीकांवर काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. पुण्यामधील गणेश कला क्रीडा मंचाच्या रंगमंदीरात राज ठाकरेंनी सभा घेतली. त्यांच्या या सभेत त्यांनी पायाच्या शस्त्रक्रियेमुळे अयोध्या दौरा रद्द करण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी संदिप देशपांडेची पोलिसांशी झालेल्या झटापटीत महिला पोलिसाला झालेल्या इजेबद्दलही आपलं मत व्यक्त केलं.
४ मे ला झालेल्या मनसेच्या भोंग्यांच्या आंदोलनाच्या वेळी संदीप देशपांडेंची पोलिसांशी झटापट झाली होती. या झटापटीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर संदिप देशपांडे हे फरार झाले होते. संदीप देशपांडेंवर ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या मध्ये मग संदिप देशपांडेंनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयानेही त्या दिवशीच फुटेज पाहिल्यानंतर संदीप देशपांडेंना त्यांची चुक नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना अटकपुर्व जामिन मंजूर करण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात या प्रकरणावर भाष्य करताना, " जणू काही भारत पाकिस्तान बॉर्डर ओलांडल्याप्रमाणे पोलिस संदीपच्या मागे लागले होते. शेवटी संदीपच्या बायकोने तो घरात नाहीये हे सांगण्यासाठी त्यांना फ्रीजचा दरवाजा उघडून दाखवला. जे कायदा पाळायल सांगतात त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करणार आणि जे कायद पाळत नाहीत, त्याचं उल्लंघन करतात त्यांच्याशी तुम्ही चर्चा करता", असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकार वर टीका केली.