आई विरोधात बाप लेक एकत्र, छोटा आदित्य निवडणूक रिंगणात
सध्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकांचा धुरळा उडाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणूकांमुळे गावात भांडणं, गट तट नको म्हणून बिनविरोध होत असतात. पण इथं मात्र खुद्द रावसाहेब दानवे यांचा जावई आणि लेक आमने सामने आले आहेत..
X
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळेच रंजक चित्र पाहायला मिळत आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचं एक पॅनल उभं केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून हर्षवर्धन जाधव बाद होणार का, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या मुलाने ऐनवेळी एन्ट्री घेत रंगत वाढवली आहे.
राजकीय संन्यास घेण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नेहमीच राजकीय वादविवाद व वक्तव्यांमुळं चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले हर्षवर्धन जाधव यावेळी मात्र त्यांच्या सुपुत्रामुळं चर्चेत आले आहे. हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव याने मंगळवारी कन्नड येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.
आदित्य जाधव याने आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचं पॅनल उभं केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत.