महिला खासदाराने संसदेतच खाल्ले कच्चे वांगे…
X
संसदेत महागाईवरील चर्चे दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी चक्क कच्चे वांगे खाऊन सामान्यांच्या व्यथा मांडल्या. वाढलेल्या महागाईमुळे सामान्यांना गॅसवर अन्न शिजवणेही परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता माणसाच्या मरणावरही टॅक्स लावणार का असा खडा सवाल उपस्थित केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमधला गतिरोध संपल्यानंतर सोमवारी दुपारी महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. एलपीजी सिलेंडर एवढा महाग झाला आहे, की कच्च्या भाज्या खाण्यासाठी मजबूर व्हावं लागत आहे, असं काकोली घोष म्हणाल्या.मागच्या काही महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमती चार वेळा वाढल्या आहेत. पहिले घरगुती गॅस 600 रुपये होता, आता यासाठी 1,100 रुपये मोजावे लागत आहेत. सरकारला आम्ही कच्च्या भाज्या खाव्या असं वाटतं का? सिलेंडरचे दर कमी केले गेले पाहिजेत, असं काकोली घोष लोकसभेत म्हणाल्या.