पंकजा मुंडे म्हणाल्या... अन्यथा त्यांना उमेदवारही मिळत नव्हता
X
पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील रामगड येथे रामनवमीनिमित्त दर्शन घेतले. तसेच या ठिकाणी सुरु असलेल्या सप्ताहाप्रसंगी भाविकांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांना या निवडणुकीसाठी उमेदवारदेखील मिळत नव्हता. विरोधी उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच तिकडे गेले आहेत, अन्यथा त्यांना उमेदवारही मिळत नव्हते अशी परिस्थिती होती”, असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.
बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहेत. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीका केली. तसेच या निवडणुकीत आपल्यासमोर खरे आव्हान कोणते आहे, यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान कोणते?
लोकसभा निवडणुकीत कोणते आव्हान तुमच्यासमोर आहे, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्यापुढे आव्हान हे अफवांचे, वेगवेगळ्या चुकीच्या चर्चांचे आहे. या चर्चा गरिबांच्या, तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मनात घर करुन आहेत. हेच माझ्यापुढे आव्हान असून याचे निराकरण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
तसेच आपण निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील कोणते नेते येणार आहेत का? यावर कोणते नेते उपस्थित राहतील, याबाबत अद्याप चर्चा केली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.