'मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही'
X
भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde Death Anniversary) यांच्या, ३ जून स्मृतिदिनाच्या औचित्याने, गोपीनाथ गडावर होणारे सर्व कार्यक्रम यावर्षी, कोरोनाच्या संकट आणि संचारबंदी मुळे रद्द करण्यात आले आहेत. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सुद्धा ३ जून ला परळीला पोहोचू शकत नाहीत. या बाबत पंकजा मुंडेंनी 'अगदी मनावर दगड ठेवून साहेबांचे दर्शन मी 3 जूनला घेऊ शकत नाही..' अशी खंत फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.
हे ही वाचा...
- ‘शिवाजी महाराजांच्या नावावर अवैध धंदे’, तृप्ती देसाईंनी दाखवले पुरावे
- क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीचा न्युड फोटो पाहून नेटकरी अवाक्
- कोविड रूग्णालयाच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या कानावर, थेट घेतली रुग्णांची भेट
गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन (Sangharsh Din) म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. यामुळे गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच समर्थकांना दर्शन घेण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की, "पोलिसांचा अंदाजानुसार गोपीनाथ गडावर स्थानिक व इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल, नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे Covid19 च्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा. लोक माझं अनुकरण करतील मी घरी राहिले तर घरी थांबतील पण मी निघाले तर अश्या स्थितीत प्रश्न निर्माण होईल."
एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या कारणासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून हा निर्णय घेत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. 'अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे.' असं दु:ख व्यक्त करत त्यांनी माझ्या पुढील सुचनांची प्रतिक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.